पन्नू हत्या कट प्रकरणी विशेष समितीकडून सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट करण्याच्या संदर्भात स्थापन केलेल्या विषेश समितीने आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या ‘त्या’ विशिष्ट व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना या अहवालात करण्यात आली आहे.
कोणत्याही व्यक्तीचे नाव अहवालात उघड करण्यात आलेले नाही. मात्र, सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या निखील गुप्ता नामक व्यक्तीसंदर्भात हे विधान असण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे मत आहे. याच व्यक्तीला या कटाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अमेरिकडून अटक करण्यात आली आहे. त्याआधी त्याचे झेकोस्लोव्हाकियाच्या सरकारने अमेरिकेला प्रत्यार्पण केले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात अमेरिकेत कारवाई केली जात असून न्यायालयात अभियोग सादर आहे.
अमेरिकेकडून माहिती
त्या व्यक्तीसंदर्भात अमेरिकेने माहिती पुरविली होती. ही व्यक्ती गुन्हेगारी गट, दहशतवादी टोळ्या, अंमली पदार्थांचे व्यापारी इत्यादी समाजकंटकांच्या संपर्कातील असू शकते. अशा व्यक्ती त्यांच्या कारनाम्यामुळे भारत आणि अमेरिका सुरक्षेला धक्का पोहचवत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई होणे आवश्यक आहे, असे समितीने स्पष्ट केले आहे. ही सूचना करण्यापूर्वी समितीने अमेरिकेने सादर पेलेले पुरावे, विविध कागदपत्रे, विविध प्राधिकरणांचे अनेक अधिकारी आणि इतर सर्व उपलब्ध पुरावे यांची सखोल तपासणी केली होती, अशी माहिती दिली गेली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
‘त्या’ विशिष्ट व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्यांशी त्याचा संबंध आहे, या बाबीही समितीने केलेल्या तपासात पुढे आल्या होत्या. या सर्व बाबींची माहिती समितीच्या अहवालात आहे. त्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई लवकरात लवकर पूर्ण केली जावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली आहे.
यंत्रणेलाही सूचना
भारतीय तपास यंत्रणा आणि इतर प्राधिकरणे यांच्यासाठी समितीने अनेक सूचना केल्या आहेत. या यंत्रणांची कार्यपद्धती सुधारली पाहिजे. अशी प्रकरणे समोर येतात, तेव्हा या यंत्रणांनी त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास ती त्वरीत करण्याची क्षमता या संस्था आणि प्राधिकारणे यांच्यात असावयास हवी, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रकरण काय आहे…
अमेरिकेचा नागरीक असलेला खलिस्तानवादी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याची हत्या करण्याचा कट रचण्याच्या हालचाली काही वर्षांपूर्वी केल्या जात होत्या. निखील गुप्ता नामम व्यक्तीवर ही जबाबदारी होती. त्याने पन्नू याची हत्या करण्यासाठी अमेरिकेतील व्यक्तीस डॉलर्स दिले असा आरोप आहे. एकंदर 1 लाख डॉलर्सची ही सुपारी होती. या रकमेपैकी 15 हजार डॉलर्स देण्यात आले होते. मात्र, हा एक सापळा होता. ज्याला ही हत्या करण्यासाठी रक्कम देण्यात आली, तो अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेतील एक सदस्य होता. त्याने त्वरित या कारस्थानाची कल्पना अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना दिल्यानंतर त्या कामाला लागल्या. गुप्ता हा त्यावेळी झेकोस्लोव्हाकियात होता. तेथील सरकारने त्याचे प्रत्यार्पण अमेरिकेच्या मागणीवरुन अमेरिकेला केले. निखील गुप्ता हा भारत सरकारशी संबंधित असून पन्नू याच्या हत्या करण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून प्रायोजित केला होता, असा ही आरोप अमेरिकेच्या काही वृत्तपत्रांमधून त्यावेळी करण्यात आला होता. तथापि, भारताने हे सर्व आरोप फेटाळले होते. अमेरिकेने भारताला यासंबंधात कागदपत्रे आणि पुरावे दिले होते. भारत सरकारने या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी समितीची स्थापना केली होती. याच समितीने हा अहवाल दिला आहे.









