मुंबई :
सांगली महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीज बिलांमधून खाजगी व्यक्ती व संस्थांच्या बिलांचा भरणा झाल्याच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी एक महिन्यात पूर्ण करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री यांनी विधिमंडळात दिले.
या प्रकरणावर आमदार सदाभाऊ खोत यांनी पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठवला. २०१९ ते २०२० या कालावधीत झालेल्या या गैरव्यवहारात प्रारंभी १.२८ कोटी रुपयांचा अपहार उघड झाला होता. मात्र, स्वतंत्र चार्टर्ड अकौंटंटमार्फत करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात तब्बल ३.४५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आ. खोत यांनी चौकशीचा विलंब, तसेच दोषींवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यासोबतच, तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली.
खास बाब म्हणजे, वैभव साबळे यांना काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या घोटाळ्याचे मूळ तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळाशी संबंधित असल्यामुळे त्यांनाही सहआरोपी म्हणून तपासाच्या कक्षेत आणण्याची मागणी आ. खोत यांनी केली.
गृहराज्यमंत्री यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे सांगली महापालिकेतील भ्रष्टाचाराचे स्वरूप पुन्हा एकदा उजेडात आले असून, सामान्य नागरिकांच्या कररूपाने जमा होणाऱ्या पैशांचा अपहार थांबवण्यासाठी जनतेला आता ठोस कारवाईची अपेक्षा आहे.








