शांततेत अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु
मुस्लिम समाजाची सहकार्याची भूमिका
सातारा प्रतिनिधी
करंजे येथील सर्व्हे नंबर 85 मध्ये अनाधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्याबाबत पालिकेकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. कब्रस्तान मुस्लिम संस्थेने संभाजीनगर येथील वक्फ न्यायालयाकडे दावा दाखल केला होता. तो न्यायालयाने दावा निकाली काढला होता. त्यानुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी, नगरपालिका यांच्याकडे केली होती. त्यानुसार बुधवारी पालिकेचा अतिक्रमण विभाग, शहर विकास विभाग असे पथकच अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेवर होते. कसलाही गाजावाजा न करता जेसीबी, कटरच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरु होती.
सातारा जिल्हाधिकारी,नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना करंजे येथील स्थानिक नागरिकांनी निवेदन देऊन मागणी केली होती. त्या निवेदनावर भानुदास राऊत, विशाल पवार, नवनाथ पवार, विकास कुंभार, तुषार पाटील, सचिन शिर्के, श्यामराव बाबर, जगन्नाथ किर्दत, भाग्यवंत कुंभार, हरिदास जाधव, अतुल बनसोडे, बलराम देशमुख, कमलाकर साबळे, संतोष किर्दत, सुनील भोजने, निलेश कुंभार, मंगेश शेटय़े, दीपक किर्दत, तेजस किर्दत, ऍड. विनीत पाटील, ऍड. अभिषेक फरांदे, ईश्वर तावसकर, संजय फडतरे, सौजन्य कदम, विकास मोरे, महेश जाधव, दीपक बाबर, सौरभ ननावरे, रवींद्र भोजने, रोहित किर्दत, उत्कर्ष किर्दत, राहुल चव्हाण, दीपक फडतरे आदींच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले होते. त्यांच्याकडून वारंवार करंजे येथील सि.सर्व्हे नंबर 85 मधील अतिक्रमणावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी सकाळीच पालिकेचे अधिकारी विश्वास गोसावी, प्रकाश राजेशिर्के, प्रशांत निकम हे जेसीबी, ट्रक्टर, कटर घेवून संबंधित ठिकाणी पोहचले. संबंधित अतिक्रमण करणाऱयांच्याकडूनही सहकार्याची भूमिका राहिल्याने ही कारवाई शांततेत सुरु होती. जेसीबी कटरने सिमेंटरचे पोल पाडून ते बाजूला करण्यात आले. मोकळी जागा करण्यात आली.
मुस्लिम समाजाची सहकार्याची भूमिका
ही कारवाई होत असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांशी तेथील मुस्लिम समाजाने सहकार्याची भूमिका दाखवल्याने शांततेत मोहिम सुरु होती. एवढेच काय पण मोहिमेवर आलेल्या अधिकाऱ्यांना मुस्लिम समाजाच्यावतीने चहापाण्याबाबत विचारणा केली. दरम्यान, एकही पोलीस कर्मचारी वा कसलाही वाद या कारवाई दरम्यान झालेला नाही असेही सांगण्यात येत आहे.









