सूचना करूनही होर्डिंग्ज हटविले नसल्याने बडगा : बंगलोधारक-जाहिरात कंत्राटदारांनी घेतला आक्षेप
प्रतिनिधी / बेळगाव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जाहिरात फलक हटविण्याची कारवाई जोरदारपणे राबविण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील जाहिरात फलक हटविण्यात आले. मात्र बंगलो परिसरातील जाहिरात फलक हटविण्यात आले नसल्याने शुक्रवारी महापालिकेच्यावतीने सदर जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी कंत्राटदार आणि बंगलोधारकांनी आक्षेप घेतला. पण निवडणूक आयोगाची परवानगी आहे का? अशी विचारणा करीत मनपाने कारवाईचा बडगा उगारला.
महापालिका हद्दीतील सर्व जाहिरात फलक हटविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला बजावली होती. केवळ नेतेमंडळी किंवा शासकीय जाहिराती न हटविता सर्वच जाहिरात फलक हटविण्याचा आदेश बजावल्याने रस्त्याशेजारी असलेले जाहिरात फलक हटविण्याची कारवाई मनपाकडून मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील चौक आणि रस्त्याशेजारील जाहिरात फलक हटविण्याची सूचना केली होती. त्यानुसार कॅन्टोन्मेंटने फ्रेमसह जाहिरात फलक हटविले होते. आठ दिवसांपूर्वी जाहिरात फलकाचे खांब गॅस कटरने कापून जाहिरात फलक उखडून काढले होते. याला जाहिरात कंत्राटदारांनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला होता. पण निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्याचे सांगण्यात आल्यानंतरही काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस संरक्षणात ही कारवाई पूर्ण करण्यात आली होती. पण बंगलो एरियामध्ये असलेल्या जाहिरात फलकांना डिफेन्स इस्टेट ऑफिसकडून परवानगी दिली जाते. जाहिरात फलक हटविण्यास बंगलोधारकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंटने बंगलो परिसरातील जाहिराती हटविल्या नव्हत्या. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाहिराती हटविण्याची सूचना केली होती.
निवडणूककाळात कोणत्याही चौक अथवा रस्त्याशेजारी जाहिरात फलक लावण्यात येऊ नयेत, अशी सूचना केल्याने धर्मवीर संभाजी चौकातील सर्व जाहिराती हटविण्यासाठी शुक्रवारी मोहीम राबविण्यात आली. कॅन्टोन्मेंटसह 23 ठिकाणांचे जाहिरात फलक हटविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आदेश बजावला होता. हे जाहिरात फलक हटविण्यासाठी मनपाचे पथक शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून धर्मवीर संभाजी चौकात ठाण मांडून होते. स्वत: महापालिका आयुक्तांनी याठिकाणी उपस्थित राहणार असल्याची सूचना मनपाच्या पथकाला केली होती. पण महापालिका आयुक्त येऊ शकले नाहीत. मात्र उत्तर विभागाचे रिटर्निंग अधिकारी तथा मनपा कौन्सिल सेव्रेटरी नांगोई महंमदअली अक्रम शहा, तसेच महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आदीसह महसूल निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन पथक व कर्मचारी दाखल झाले होते.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांना बोलावून फलक हटविण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या कंत्राटदारालाही याबाबत सांगण्यात आले. पण कंत्राटदाराने जाहिरात फलक हटविण्यास नकार देऊन आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही कारवाई केली जात असल्याचे कंत्राटदार निलेश पाटील यांना सांगण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात आली आहे का? अशी विचारणा करण्यात आली. निवडणूककाळात कोणत्याच जाहिराती विनापरवानगी लावू नयेत, अशी सूचना करण्यात आली. त्यानंतर जाहिरात फलक हटविण्यासाठी कारवाई करताना बंगलोधारकांनी विरोध केला. पण पोलीस संरक्षणात जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली.
धर्मवीर संभाजी चौकातील ‘तो’ फलकही हटविला
महापालिकेने शहरातील विविध फलक हटविले होते. पण धर्मवीर संभाजी चौकात मनपा हद्दीत असणारा पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकाकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील जाहिरात फलक हटविणाऱ्या मनपा प्रशासनाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकाला सूट दिली आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या कारवाईवेळी सदर फलकदेखील हटविण्यात आला.