घाऊक मार्केटबाहेरील रस्त्यावर ठाण : पोलीस बंदोबस्तात कारवाई
मडगाव : एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटबाहेरील रस्त्यावर बसून बेकायदा किरकोळ मासेविक्री करणारे विक्रेते मडगाव पालिकेसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. गुरुवारी पालिकेच्या कारवाई पथकाने त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, तरी तेथून जात नसल्याने शेवटी पोलीस बंदोबस्तात कारवाई करून काहींच्याकडील मासळी पालिकेने जप्त केली. या रस्त्यावर कित्येक किरकोळ विक्रेते बेकायदा मासेविक्री करत असल्याने आपल्या ग्राहकांवर परिणाम होत असल्याचा दावा किरकोळ बाजारातील मासेविक्रेते करत आले आहेत. तसेच बर्फातील माशांची विक्री करण्यात येत असल्याने सर्व रस्त्यावर दुर्गंधी व पाणी पसरत असल्याने लोकांच्या याबाबत तक्रारी आहेत. मडगाव पालिका क्षेत्रातील कचरा विल्हेवाटीसंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून न्यायालयासमोर हा बेकायदा किरकोळ मासेविक्रीचा विषय आला होता. त्यामुळे पालिका वरचेवर येथे कारवाई करून मासे व अन्य साहित्य जप्त करत आले असले, तरी हा प्रकार बंद होत असल्याचे दिसून येत नाही. कालच्या कारवाईच्या वेळी काही विक्रेत्यांकडून काढता पाय घेण्यात आला. मात्र लगेच घाऊक मासळी मार्केटच्या आतमध्ये त्यांनी बाजार थाटल्याचे दिसून आले. हा परिसर पालिकेच्या कार्यकक्षेत येत नसल्याने पालिकेने कोणतीही पावले उचलली नाहीत. दरम्यान, जप्त केलेली मासळी पाजीफोंड येथील ल्हार तसेच कोलवा येथील लिटल हेवन या अनाथाश्रमांना देण्यात आल्याची माहिती मार्केट निरीक्षक शेखर गावकर यांनी दिली.









