डिचोली-वाळपई पोलिसांची संयुक्त मोहीम : शेकडो वाहन चालकांना दंड
वाळपई : सध्या गोव्यामध्ये अपघाताचे प्रमाणा वाढत आहे. गेल्या एक महिन्यांत विविध ठिकाणी गंभीर अपघात घडलेले आहेत. यामध्ये अनेकांनी प्राणही गमावले आहेत. याची दखल घेऊन पोलीस खात्याकडून राज्याचे वेगवेगळ्या भागांत दंडात्मक कारवाई करून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, बुधवारी वाळपई पोलीस व डिचोली वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये दंड ठोठावण्यात आलेला आहे. वाळपई सरकारी ऊग्णालयासमोर अचानकपणे हाती घेतलेल्या कारवाईमुळे अनेकांची तारांबळ उडाली. यामुळे मिळेल त्याठिकाणी पळ काढून कारवाईपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या मोहितून चांगला महसूल गोळा झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे वाळपई होंडा भागातील या रस्त्यावर वाळपई ऊग्णालयासमोर संध्याकाळी 4 वा.अचानकपणे ही कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाळपई पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते व डिचोली पोलीस वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यानी ही संयुक्तपणे कारवाई केली. यावेळी विनापरवाना वाहने चालविणे, हेल्मेट न घालणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे याच्या विरोधात ही कारवाई हाती घेण्यात आली. रात्री 7 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यामुळे अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. काहींची वाहने जप्त केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले.
कारवाईची मोहीत सुरूच राहणार!
गोव्यामध्ये वाहतूक कायद्याचे उल्लंघन करण्याच्या विरोधात कडक कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. याचाच भाग म्हणून वाळपई शहरांमध्ये अशा प्रकारची कारवाई हाती घेण्यात आली. यावेळी अनेकांना दंड माराण्यात आला असून काहींची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. अशी कारवाई सुरूच राहणार असून विनापरवाना गाडी चालवण्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. सुमारे 100 पेक्षा जास्त जणांवर यावेळी कारवाई करण्यात आली असून आगामी काळातही अशाच प्रकारची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले, अशी माहिती वाळपई पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी दिली.









