जिल्हा तंबाखू नियंत्रण-मनपातर्फे ठोठावला दंड
बेळगाव : महानगरपालिका व जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाच्यावतीने कोटपा कायद्यांतर्गत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकान व हॉटेल्सवर कारवाई करून 15 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचबरोबर हॉटेल्सवरही धाडी टाकून अस्वच्छतेप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाचे नोडल अधिकारी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता. तंबाखू विकणे हा गुन्हा आहे. शाळा, महाविद्यालय यासह इतर परिसरात बेजबाबदारपणे विक्री करण्यात येत होती. चहाच्या टपरीवरदेखील बिनधास्तपणे विक्री सुरू होती. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीनगर उद्यान, महांतेशनगर बसस्थानक या परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. चहाच्या टपरीवर तंबाखू, सिगारेट यासह इतर साहित्याची विक्री केली जात होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.









