उत्तर गोवा पोलिस अधीक्षक कौशल यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील पर्यटन स्थळांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. उत्तर जिल्हा पोलिस आणि पर्यटक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एक हजारहून अधिक बोगस दलांलावर कारवाई केली आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील शांतता भंग करणाऱ्या प्रकारांवर अंकुश असावा यासाठी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली असल्याची माहिती उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे. राज्यातील दोन्ही जिह्यांमध्ये दररोज अंमलबजावणी मोहीम सुऊ आहे, असेही कौशल म्हणाले.
काल पणजीतीत पोलिस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक अक्षत कौशल बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या 193 पर्यटकांवर, समुद्रकिनारी कचरा फेकणाऱ्या 545 जणांवर, किनाऱ्यावर वाहन चालवणाऱ्या 14 जणांवर आणि कोटपा कायद्यांतर्गत 265 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत, असेही कौशल यांनी सांगितले.
पोलिस दलालांना ताब्यात घेतात आणि कायद्यानुसार दंड आकारतात. जे वारंवार कायद्याचे उल्लंघन करतात त्यांना अटकही केली जाते. कळंगुट, हणजूण, मांद्रे येथील पोलिस स्थानकांत याबाबत सर्वाधिक तक्रारी नोंद होतात. दरम्यान, कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे, असे कौशल म्हणाले. सर्व शॅकधारक आणि स्थानिक व्यावसायिकांची नियमित बैठक घेतली जाते. पोलिस कर्मचारी या ठिकाणी 15 दिवसांनी भेट देतात. काही अडचण निर्माण झाली तर पर्यटकांनी पोलिसांकडे थेट संपर्क साधावा, असे आवाहनही अधीक्षक कौशल यांनी केले.









