जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार
बेळगाव : शिक्षण विभागाची पूर्वपरवानगी न घेता काही शिक्षकांनी शाळा बंद ठेवून सोमवारी झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. शाळा बंद ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार करताच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षकांची माहिती मागविण्यात आली असून शाळेवर उपस्थित नसलेल्या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले. सोमवारी बेंगळूर येथील फ्रिडम पार्क येथे पीएसटी शिक्षकांचे आंदोलन होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगाव शहरातील शंभरहून अधिक तर तालुक्यातील सुमारे दोनशे शिक्षक सहभागी झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काही शिक्षकांनी शाळा बंद ठेवत आंदोलनात सहभाग दर्शविल्यामुळे टीकेची झोड उठविण्यात आली. आधीच पावसामुळे आठवडाभर शाळा बंद असताना आता पुन्हा सरकारी शाळा बंद ठेवण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
शहर व तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती. तर काही ठिकाणी केवळ अतिथी शिक्षकांवर कारभार सोपवून शिक्षक बेंगळूरला गेल्याचे दिसून आले. पोलीस क्वॉर्टर्स येथील कन्नड व उर्दू शाळेत शिक्षकच नसल्याने शाळा बंद ठेवावी लागली. यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित करताच शिक्षण विभागाने सारवासारव करण्यास सुरुवात केली. जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांना याविषयी विचारले असता त्यांनी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. जे शिक्षक आंदोलनात सहभागी होते, त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला माहिती द्यावी, असे सांगण्यात आले होते. परंतु, शिक्षकांनी तशी माहिती दिलेली नाही. शिक्षण आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रक काढून शाळा बंद ठेवू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश बजावले होते. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळेवर उपस्थित नसलेल्या शिक्षकांची माहिती मागविण्यात आली असून गैरहजर शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









