आप नेत्याकडून केंद्रावर आरोप ः सिसोदियांना क्रूर कैद्यांसोबत ठेवले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःचे सहकारी मनीष सिसोदिया यांना झालेल्या अटकेच्या कारवाईला अनोख्या प्रकारे विरोध दर्शविला आहे. केजरीवालांनी बुधवारी राजघाट येथे जात महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. यानंतर केजरीवालांनी निषेधार्थ ध्यानधारणा केली आहे. तर आम आदमी पक्षाने मनीष सिसोदिया यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक 1 मध्ये ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकार सिसोदिया यांची राजकीय हत्या घडवून आणू पाहत आहे. या तुरुंगात क्रूर दहशतवादी आहेत, सिसोदियांनी विपश्यना कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती, परंतु ही मागणी नाकारण्यात आल्याचा दावा आप नेते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. सिसोदियांना कुठल्यातरी षड्यंत्राच्या अंतर्गत तिहारच्या तुरुंग क्रमांक 1 मध्ये ठेवण्यात आले आहे. या तुरुगांत सुनावणीधीन कैद्यांना ठेवले जात नसल्याचे भारद्वाज यांनी म्हटले आहे.
तिहार तुरुंग क्रमांक 1 मध्ये देशातील सर्वात धोकादायक आणि हिंसक कैदी आहेत. हे कैदी मानसिकदृष्टय़ा आजारी असून ते छोटय़ा इशाऱयावरही कुणाचीही हत्या करू शकतात. भाजप हा आम आदमी पक्षाचा राजकीय स्पर्धक आहे, परंतु राजकारणात अशाप्रकारचे शत्रुत्व असू नये. दिल्लीत आम आदमी पक्षाला पराभूत न करता आल्याने अशाप्रकारे भाजप सूड उगवत असल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.
सिसोदियांवरील कारवाईप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगले आहे. आम आदमी पक्षाला राजकीयदृष्टय़ा नुकसान पोहोचविता येत नसल्याने भाजप सरकारच्या पक्षाच्या एका नेत्याला तुरुंगात डांबले आणि आता आमच्या नेत्यांची हत्या घडवून आणण्यासाठी षड्यंत्र रचला जात असल्याचा आरोप आप नेत्याने केला आहे.
देशासाठी चिंतेत ः केजरीवाल
आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ यंदा रंगपंचमी साजरी करणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केली होती. देशाची स्थिती चिंताजनक असल्यानेच मी देशासाठी प्रार्थना करणार आहे. सिसोदिया आणि जैन हे तुरुंगात आहेत, तर दुसरीकडे अदानींविरोधात कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. लोकांना चांगले शिक्षण आणि उत्तम आरोग्य सुविधा देणाऱयांना तुरुंगात डांबले जात आहे, तर देशाला लूटणाऱयांचे पंतप्रधान समर्थन करत आहेत. स्थिती चिंताजनक असल्याने मी देशासाठी ध्यान आणि प्रार्थना करणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले होते.









