ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरुन हटविल्याचे पत्र पाठविले असून, ते बेकायदेशीर आहे. हे कृत्य पक्षाला आणि लोकशाहीलाही शोभादायक नाही. पक्षप्रमुखांनी कारवाई मागे घेतली तर ठिक नाहीतर आम्ही त्याला कोर्टात आव्हान देऊ, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिला आहे.
पणजीमध्ये पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही. त्यांना आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस जवळची वाटत असेल तर त्यांचा भ्रम कधीतरी दूर होईल. ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना पक्षनेतेपदावरुन हटविण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर आहे. ज्यावेळी सभागृह नेत्यांचा अपमान होतो तेव्हा हक्कभंगाची कारवाईही केली जाते. कारण सभागृहाचं कामकाज चांगलं चालावं या उद्देशानं या पदाची निर्मिती असते. ते केवळ एका पक्षाचे नसतात तर संपूर्ण सभागृहामध्ये जेवढे पक्ष आहे तेवढय़ाचं प्रतिनिधीत्व ते सभागृहाचे नेते म्हणून करत असतात. हा एक वेगळा दर्जा असतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कारवाई मागे न घेतल्यास आम्ही त्यांना कायदेशीर उत्तर देऊ.
दरम्यान, फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये येण्याने मजबुती मिळाली आहे. भाजप आणि शिवसेनेची मनं जुळणं गरजेचं आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे. पण आमचे कुटुंबप्रमुख बाहेर आहेत. ते आमच्यात आले तर आम्हाला आनंद होईल. एकनाथ शिंदे आता राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही राज्याचा विकास करू, असेही केसरकर म्हणाले.