पुणे : पंजाबमधील प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात लाॅरेन्स बिष्णाेई टाेळीचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातील संताेष जाधव व साैरभ महाकाल या दाेन सराईत आरोपींची नावे संशयित म्हणून समाेर आल्याने खळबळ उडाली हाेती. पुणे ग्रामीण पाेलीसांनी दाेन्ही फरार आराेपींचा शाेध घेऊन त्यांच्यासह साथीदारांना अटक केली. मंगळवारी पाेलीसांनी संताेष जाधवसह नऊ आराेपी व एक विधीसंघर्षित बालक यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (माेक्का) कलम ३ (१) (२), ३ (४) नुसार कारवाई केल्याची माहिती पाेलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी दिली.
संताेष सुनील जाधव (रा.पाेखरी, ता. आंबेगाव, पुणे), जीवनसिंग दर्शनसिंग नहार (रा.मंचर, ता. आंबेगाव, पुणे), श्रीराम रमेश थाेरात (रा.मंचर, पुणे), जयेश रतिलाल बहिरम (रा.घाेडेगाव, पुणे), गणेश तारु, वैभव शांताराम तिटकारे (रा.जळकेवाडी, ता. आंबेगाव, पुणे), राेहित विठठल तिटकारे (रा.नायफड, ता.खेड, पुणे), जिशान इलहिबक्श मुंढे (रा.घाेडेगाव, पुणे), सचिन बबन तिटाकरे (रा.धाबेवाडी, ता.खेड, पुणे) व एक विधीसंघर्षित बालक अशी माेक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. नारायणगाव पाेलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाॅटर प्लांट व्यवसायिकाला संताेष जाधव याने व्हाॅटसॲप मेसेंजर या ॲप्लिकेशन मधून काॅल करुन तसेच साथीदारांना पाठवून त्याच्याकडून ५० हजार रुपये खंडणीची मागणी केली हाेती. त्याबाबत नारायणगाव पाेलीस ठाण्यात आराेपींवर गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास करताना तपास अधिकारी सहाय्यक पाेलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी आराेपींवर माेक्का नुसार कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पुणे जिल्हा पाेलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला हाेता. त्यानुसार विशेष पाेलीस महानिरीक्षक मनाेज लाेहिया यांनी या प्रस्तावाचे अवलाेकन करुन संताेष जाधव टाेळीविरुध्द माेक्का कलम वाढ करण्यास परवानगी दिली. गुन्हयाचा पुढील तपास जुन्नर विभाग उपविभागीय पाेलीस अधिकारी मंदार जावळे करत आहेत.









