26 टॅक्टर, 4 जेसीबी ताब्यात : जिल्हा पोलीसप्रमुखांची कारवाई : वाळू माफियांचे धाबे दणाणले
वार्ताहर /अथणी
महेशवाडगी (ता. अथणी) येथील कृष्णा नदीतून बेकायदा वाळू उपसा करण्यात येत होता. त्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली. यावेळी छापा टाकून पोलिसांनी नदीकाठावरील 26 ट्रॅक्टर, 4 जेसीबी जप्त केले. या कारवाईमुळे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाईविषयी अधिक माहिती अशी, अथणी तालुक्याच्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदा वाळू उपसा सुरु आहे. सध्या पावसाने दडी मारल्याने नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्याचा फायदा घेताना वाळू माफियांनी वाळू उपसा करून लाखो रुपयांची माया गोळा केली आहे. सरकारने नदीतील वाळू उपशावर बंदी घातली आहे. तसा आदेश काढण्यात आला आहे. तरीही त्या आदेशाला केराची टोपली दाखवत काहींनी सदर काम जोमाने सुरु ठेवले होते. त्याची माहिती डॉ. संजीव पाटील यांना मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली अथणीचे डीवायएसपी विश्वनाथ जल्दे, सीपीआय रवींद्र नाईकवडी, पीएसआय राकेश बगली, पीएसआय शंकर मुक्री व अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने रविवारी सकाळी 6.30 वाजता धडक कारवाई करण्यात आली. यावेळी वाळू उपशासाठी व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. संबंधितांविरोधात अथणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









