चिपळूण :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कामथे-हरेकरवाडी येथे शनिवारी रात्री रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्यावरून गेल्या 36 तासात कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल ठाकरे शिवसेनेची युवासेना आक्रमक झाली. सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. यावर येत्या तीन दिवसांत रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीवर कारवाई व टँकर मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची हमी या अधिकाऱ्यांनी युवासेनेला दिली आहे.
शनिवारी रात्री सुमारे 9 वाजता कामथे- हरेकरवाडी येथील एका धाब्याजवळील नाल्याजवळ पाच टँकर एका ओळीत उभे होते. सुऊवातीला तेथील नागरिकांना वाटले की चालक आणि वाहक जेवणासाठी थांबले असावेत. मात्र काही तऊण रात्री खेकडे पकडण्यासाठी नदीकाठी गेले असता त्यांना तीन इंचाच्या पाईपद्वारे टँकरमधून रासायन मिश्रित पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे लक्षात आले. या तऊणांनी ही माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर तेही तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोन टँकर अडवले. मात्र ग्रामस्थांनी घेराव घालण्याचा प्रयत्न करताच तीन रिकामे टँकर घटनास्थळावरून पसार झाले. यावेळी भरलेले टँकर आणि त्यावरचे चालकही पळून गेले.
याबाबतची माहिती तत्काळ पोलीस आणि महसूल प्रशासनाला संपर्क साधून देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही टँकर ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर याबाबतचा तपास करतानाच हे टँकर गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीतून आल्याचे पुढे आले. दरम्यान या प्रकरणी गेल्या दोन दिवसात कोणतीही कारवाई न झाल्याने युवासेना आक्रमक झाली.
- अधिकाऱ्यांना विचारला जाब
सोमवारी तालुकाप्रमुख उमेश खताते यांच्यासह ठाकरे सेनेचे विभागप्रमुख राम डिगे, संभाजी खेडेकर, उपशहरप्रमुख भैय्या कदम, शाखाप्रमुख संतोष रहाटे, संतोष जावळे, सुभाष साळवी, पांडुरंग हरेकर, विठ्ठ्ल हरेकर, लक्ष्मण जवरत, प्रवीण खेडेकर, संजय चांदे, प्रसाद मोरे, सचिन चोरगे, पार्थ जागृष्टे, ओंकार पंडीत, प्रकाश डिगे, सचिन लटके आदींनी सकाळी 11.30 वाजता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावर उपप्रादेशिक अधिकारी कुलकर्णी, क्षेत्र अधिकारी उत्कर्ष शिणगारे यांनी वस्तूस्थिती सांगतानाच पाण्याचे, टँकरमधील रसायनाचे नमुने घेण्यात आले असून कंपनीत जाऊन पाहणीही केली जाणार आहे. वस्तूस्थिती अहवाल प्रादेशिक अधिकारी कोल्हापूर यांना पाठवण्यात येणार असून तीन दिवसांत पाण्याचा अहवाल आल्यानंतर साफयिस्ट कंपनीवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
दरम्यान, या प्रकारामुळे पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झालेले असल्याने अहवाल येईपर्यंत कंपनीच्या माध्यमातून दोन पाण्याचे टँकर कामथेजवळील लोकवस्तीत पाठवण्याची मागणी केली असता अधिकाऱ्यांनीही तयारी दर्शवली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांची ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.








