वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेश सरकारचे यश पाहून दिल्ली सरकारनेही ‘सडक सख्याहरीं’ (रोडसाईड रोमिओज) विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिल्ली पोलिसांचे विशेष दल स्थापन करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील अशा प्रकारची गुंडगिरी कठोर धोरण लागू करुन नियंत्रणात आणली आहे. त्यामुळे त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकण्याचा निर्णय दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेही घेतला आहे.
मार्गांवरुन जाणाऱ्या महिला, तरुणी आणि मुलींची छेड काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्तर प्रदेश सरकारने अशा रोमिओजना धडा शिकविण्यासाठी विशेष दलाची स्थापना केलाr होती. या दलाने या राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये या रोडसाईड रोमिओजना पकडून त्यांना समज देण्याचे अभियान हाती घेतले आहे. ते मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरताना दिसून येते. या दलाकडे विशेष कामगिरी सोपविण्यात आली आहे. छेडछाड करण्यापासून समाजकंटकांना रोखणे, त्यांच्यावर कारवाई करुन शिक्षा करणे आणि पिडित महिलांना आवश्यक ते साहाय्य करणे, अशा तीन सूत्रांवर हे दल कार्य करते. सडक सख्याहरींना धडा शिकविताना योग्य ती संवेदनशीलता दाखविण्याची सूचनाही या दलाला करण्यात आल्याने हे दल अतिरेक न करता आपले उत्तरदायित्व पार पाडत असल्याचे दिसून येते. यामुळे महिलांमधून समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









