रविवारपेठेतील दुकानांमधील 50 किलो प्लास्टिक जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
प्लास्टिकविरोधी मोहिमेंतर्गत सोमवारी बाजारपेठेसह रविवारपेठेतील दुकानांवर धाडसत्र राबविण्यात आले. या ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या, ग्लास, बाऊल असे विविध साहित्य जप्त करण्यात आले. तसेच या कारवाई दरम्यान 14 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
प्लास्टिक बंदी करण्यात आल्याने सिंगल यूजमध्ये प्लास्टिकच्या साहित्याची विक्री करू नये तसेच साठा करण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सोमवारी रविवारपेठेसह बाजारपेठेतील विविध दुकानांवर धाड टाकली. या कारवाईवेळी प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱया दुकानांना लक्ष्य करण्यात आले. पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईवेळी 50 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच प्लास्टिक साहित्याची विक्री करणाऱया व्यावसायिकांकडून 14 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईवेळी पर्यावरण साहाय्यक अभियंते प्रवीण खिल्लारी, स्वच्छता निरीक्षक श्रवण कांबळे, पुंडलिक राठोड, सुवर्णा पवार व रुकसार यांच्यासह मनपाचे कर्मचारी सहभागी होते.
पंधरा दिवसांत 72 किलो प्लास्टिक जप्त
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार दि. 1 जुलैपासून देशात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. मात्र काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, महापालिकेने शहरात प्लास्टिकविरोधी मोहीम राबवून मागील पंधरा दिवसांत 72 किलो प्लास्टिक जप्त करून 43 हजार 900 रुपये दंड वसूल केला आहे.
शहरात प्लास्टिक बंदी असली तरी प्लास्टिकचा वापर बिनधास्तपणे सुरू आहे. शासनाकडून कडक कारवाई केली जात नसल्याने सिंगल यूज प्लास्टिकचा वापर केला जात आहे. प्लास्टिकमुळे कचऱयाचे प्रमाण वाढले असून नदी, नाले प्रदूषित होत आहेत. तसेच दररोज 40 टक्क्मयांहून अधिक प्लास्टिकचा कचरा होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे मनपानेदेखील प्लास्टिक बंदीच्या कारवाईस प्रारंभ केला आहे.
यापुढेही मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे महापालिकेतून सांगण्यात आले. पण सध्या विविध कामांचा भार अधिकारी व कर्मचाऱयांवर दिल्याने ही मोहीम थंडावली आहे. प्लास्टिकविरोधी कारवाईमुळे सिंगल यूज प्लास्टिकची विक्री व वापर कमी झाला आहे.