श्रीनगर येथील व्यावसायिकाला ठोठावला 15 हजारांचा दंड : परवाना न घेतल्याचा ठपका
बेळगाव : श्रीनगर येथील झेप्टो ऑनलाईन शॉपिंग सेंटरवर आहार सुरक्षितता अधिकारी व मनपाच्या आरोग्य खात्याने कारवाई करत 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला. मंगळवार दि. 31 रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. मुदत संपलेले आइस्क्रीम पुरविण्यासह मनपाकडून व्यवसाय परवाना न घेतल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. श्रीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या झेप्टो ऑनलाईन शॉपिंग सेंटरबाबत लोकांनी मनपाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे या तक्रारींची दखल घेत मंगळवारी आहार सुरक्षितता अधिकारी येरेगार व मनपाच्या आरोग्य निरीक्षक सुशिला व त्यांच्या सहकाऱ्यांनी माळमारुती पोलिसांच्या मदतीने सदर सेंटरची तपासणी केली. त्यावेळी संबंधितांनी सेंटर चालविण्यासाठी मनपाकडून रितसर व्यवसाय परवाना (ट्रेड लायन्स) घेतला नसल्याचे दिसून आले. त्याचबरोबर ग्राहकाला मुदत संपलेला आइस्क्रीम पुरविल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संबंधितांना 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या ऑनलाईन शॉपिंग सेंटरमधून दैनंदिन वस्तू ग्राहकांना घरपोच पोहचविल्या जातात. पण त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.









