वाहतूक पोलिसांकडून 54 वाहनचालकांना दंड
बेळगाव : शहर व उपनगरात कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी मोहीम राबविली. या मोहिमेत 54 मोटारसायकलचालकांवर कारवाई केली असून बहुतेक सायलेन्सर पोलिसांनी काढून ठेवले आहेत. वाहतूक व गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम, दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. कर्कश आवाजाचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले आहेत. उपनगरात व शिक्षण संस्था असलेल्या ठिकाणी कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. उत्तर व दक्षिण विभाग पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात एकूण 54 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली असून सुमारे 27 हजार रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.









