चार महिन्यांत 13 लाखांचा दंड वसूल
बेळगाव : वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जानेवारी ते एप्रिल 2023 पर्यंत बसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या 13 हजार 956 प्रवाशांना पकडून त्यांच्याजवळून 13 लाख 24 हजार रुपये दंड वसूल केला आहे. परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सार्वजनिक संपर्क अधिकारी एच. रामनगौडर यांनी रविवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून धारवाड, बागलकोट, बेळगाव, गदग, हावेरी, कारवार जिल्ह्यातील 55 डेपोच्या 4 हजार 445 बसमध्ये रोज 16 ते 17 लाख प्रवासी प्रवास करतात. गळती थांबविण्यासाठी बस अडवून तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या पथकांनी गेल्या चार महिन्यांत 71 हजार 21 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्या 13 हजार 956 प्रवाशांना पकडले आहे. या प्रवासामुळे परिवहन मंडळाला 1 लाख 41 हजार 391 रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी 13 लाख 24 हजार 245 रुपये इतका दंड वसूल केला आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत परिवहन मंडळाच्या बसमध्ये विनातिकीट प्रवास करणे शिक्षापात्र गुन्हा आहे. तिकिटाच्या दहापट किंवा 500 रुपयांपर्यंत जागेवरच दंड भरावा लागतो. सहप्रवाशांसमोर अपमानही सहन करावा लागतो. त्यामुळे कोणीही विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहनही परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.









