प्रतिनिधी/ बेळगाव
बोगस बांधकाम कामगारांची संख्या कमी करून कामात पारदर्शकता आणण्यासाठी कामगार खात्याने बोगस बांधकाम कामगारांवर कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्मयात विशेष पथकांकडून ही कारवाई सुरू आहे. त्यामुळे बोगस कामगारांना दणका बसून लवकरच नोंदणीकृत कामगार समोर येणार आहेत.
शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नसलेल्यांनीही खोट्या कागदपत्रांची पूर्तता करून कामगार कार्ड मिळविले आहे. अशांवर आता कारवाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात 2 लाख 6 हजार 96 इतक्मया बांधकाम कामगारांची नोंद आहे. मात्र बोगस बांधकाम कामगारांची संख्यादेखील अधिक आहे. केवळ शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगस कामगारांची संख्या वाढली आहे. अशांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
बेळगाव, गोकाक, हुक्केरी, निपाणी, कागवाड, चिकोडी, बैलहोंगल, सौंदत्ती, अथणी, रायबाग आदी तालुक्मयांमध्येही कारवाई केली जात आहे. विशेषत: बेळगाव तालुक्मयात बोगस कामगारांची संख्या अधिक आहे. परजिल्ह्यांतून कामासाठी आलेल्या कामगारांची संख्याही अलीकडे वाढलेली आहे. त्यामुळे आता यापैकी बोगस कामगार अडचणीत येणार आहेत.









