आमदारापासून शिक्षकालाही अटक : 23 विद्यार्थ्यांवर कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशविरोधी टिप्पणी करणाऱ्या सुमारे 28 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आमदार, शिक्षक, पत्रकार, विद्यार्थी आणि वकील सामील आहेत. ईशान्येतील 3 राज्ये आसाम, मेघालय आणि त्रिपुरातही ही कारवाई करण्यात आली आहे.
सर्वप्रथम ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे आमदार अमीनुल इस्लाम यांना अटक करण्यात आली होती. अमीनुल यांनी 2019चा पुलवामा हल्ला आणि अलिकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सरकारचा कट संबोधिले होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवत 4 दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
देशविरोधी पोस्ट करणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठलीच समानता नाही. दोन्ही देश परस्परांचे शत्रू आहेत असे उद्गार आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी काढले आहेत.
ईशान्येत 19 आरोपींना अटक झाली असून केवळ आसाममध्येच यातील 14 जणांना अटक झाली आहे. हैलाकांडी येथील पत्रकार मोहम्मद जाबिर हुसैन, सिलचर येथील कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी मोहम्मद एके बहाउद्दीन आणि वकील मोहम्मद जावेद मजूमदार, मोरीगाव येथील मोहम्मद महाहर मियां, करीमगंज येथील मोहम्मद मुस्ता अहमद उर्फ सोहेल आणि शिवसागर येथील मोहम्मद साहिल अलीला अटक करण्यात आली आहे.
तर त्रिपुरात देखील 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात धलाई जिल्ह्यातील निवृत्त शिक्षक जवाहर देवनाथ आणि धर्मनगर येथील निवृत्त शिक्षक सजल चक्रवर्ती यांचा समावेश आहे. मेघालयात सायमन शायला याला पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातून अटक करण्यात आली. या सर्व आरोपींवर भारतविरोधी टिप्पणी केल्याचा आरोप आहे.









