पुणे / प्रतिनिधी :
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शॉर्टलिस्ट केलेल्या सराईतांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत तब्बल 3700 हून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून 11 हजारांवर गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली होती. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्यात आला आहे.
कायदा सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरूद्ध कारवाईचा डेटा एकत्रित करण्यात आला होता. त्यानुसार विविध पोलिस ठाण्यातंर्गत सराईत गुन्हेगार, रायझिंग गँग, भाईगिरी दादागिरी करणार्या 11 हजारांवर गुन्हेगारांची कुंडली बनविण्यात आली. सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून संकलित माहितीच्या आधारे सराईतांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे. मागील काही दिवसांत तब्बल 3700 हून अधिक गुन्हेगार, त्यांचे ठिकाण, हालचालींवर लक्ष ठेउन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय 9 गुन्हेगांरी टोळयांमधील 65 गुन्हेगारांना मोक्काचा दणका देण्यात आला आहे. एपीडीएनुसार 3 गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले असून 42 जणांना तडीपार करण्यात आले आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह भाईगिरी-दादागिरी करणार्यांविरूद्ध ऑपरेशन ऑल आऊट, कॉम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहे. गुन्हेगार चेकींग, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार योजना राबवून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत ओह. सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गुन्हे शाखेकडून वेळोवेळी ड्राईव्ह घेण्यात येत आहे. त्याशिवाय महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, औषधी द्रव्यविषयक हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्तीच्या विघातक कृत्यास आळा घालण्यासाठी एमपीडीएअंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.