अभिनेते राज के. पुरोहित यांची माहिती : नृत्य-अभिनय यांचे प्रशिक्षण : प्रवेश प्रक्रिया सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
अभिनयाच्या कार्यशाळेसाठी आता मुंबई, पुणे या नगरांची वाट धरण्याचे कारण नाही. कारण बेळगावमध्ये आता अभिनयाच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. बेळगावचेच अभिनेते राज के. पुरोहित यांनी असेच अभिनयाचे वर्ग सुरू केले आहेत, जेथे अभिनयाचे प्राथमिक प्रशिक्षण सहजगत्या उपलब्ध होणार आहे.
बेळगावमधील कलाकारांच्या प्रतिभा विकसित करणे, त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देणे या हेतूने त्यांनी हे वर्ग सुरू केले आहेत. या ठिकाणी नृत्याचेही वर्ग घेतले जाणार आहेत. ज्यामधून पाश्चिमात्य, अर्धशास्त्रीय, लोकनृत्य, समकालीन, सालसा, हिपहॉप या नृत्यांचे वर्ग आठवड्यातून चार दिवस घेतले जाणार आहेत.
अभिनय शिकण्यासाठी येथे प्रशिक्षक, संवाद, उच्चार, आवाजातील चढ-उतार, बोलण्यातील स्पष्टता, चेहऱ्यावरील हावभावांचा प्रभावीपणे वापर, देहबोलीचा वापर याबद्दल प्रशिक्षण देतील. कॅमेऱ्याला कसे सामोरे जावे व सभाधीटपणा याबद्दलही प्रशिक्षण दिले जाईल. एक महिन्याच्या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण दिले जाईल. मुख्य म्हणजे नृत्य आणि अभिनय यांचे प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईमधील नामवंत कलाकार येणार आहेत.
राज के. पुरोहित यांनी अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. विविध माहितीपट, चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले असून विविध कार्यक्रमांचे अँकरिंगही केले आहे. हिंदी टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. याशिवाय कन्नड, तमिळ, तेलगू, भोजपुरी, गुजराती, मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेडगेवार यांच्यावरील बायोपिकमध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या एका इंडो-अमेरिकन चित्रपटावर त्यांचे काम सुरू आहे.
त्यांच्या चित्रपट आणि मालिकांमधील अभिनयाचा उपयोग बेळगावच्या कलाकारांना व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी हे वर्ग सुरू केले आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अधिक माहितीसाठी 9880111577, 9322687804 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.









