मालवण | प्रतिनिधी
आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहिले
आंबेरी बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणी चौके येथील राजन शशिकांत गावडे, संजय बाळकृष्ण डिचोलकर, प्रकाश निळकंठ तावडे, लक्ष्मण चंद्रकांत तावडे यांची मे. मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई व अंबरीष गावडे यांनी काम पाहीले.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचा वाळू उत्खनन मनाई आदेश असताना व लिलाव प्रक्रिया बंद असताना आंबेरी येथील खाडीकिनारी होड्यांमधून बेकायदेशीर वाळू उपसा करण्याच्या प्रयत्नात असल्याबाबत राजन शशिकांत गावडे, संजय बाळकृष्ण डिचोलकर, प्रकाश निळकंठ तावडे, लक्ष्मण चंद्रकांत तावडे सर्व राहणार चौके ता मालवण यांचे विरूध्द मालवण पोलीस ठाण्यामध्ये 23 ऑगस्ट 2018 रोजी भा.दं.वि. कलम 379,511 प्रमाणे मा. तहसिलदार मालवण यांचेवतीने मंडळ अधिकारी मालवण यांनी फिर्याद दाखल केली होती व आरोपींच्या वाळू उपश्याकरता वापरल्या जाणार्या होड्या जप्त केल्या होत्या. त्यावेळी महसूल विभागाने तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उत्खननाविरुद्ध धडक कारवाई करत ठिकठिकाणचे वाळूचे रॅम्प उध्वस्त केले होते.
पोलीसांनी संशयित आरोपींविरूध्द तपासकाम करून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते.याकामी सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद, फिर्यादीस झालेला विलंब, साक्षीदारांचे जबाबातील विसंगती व तपासकामातील त्रुटी विचारात घेवून मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांनी संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.









