येळ्ळूर कुस्ती आखाडा खटला : द्वितीय जेएमएफसी न्यायालयाचा निकाल
बेळगाव : येळ्ळूर कुस्ती आखाड्यात आचारसंहिता भंग करण्यासह भाषिक द्वेष निर्माण केल्याचा ठपका ठेवत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या खटल्याची सुनावणी जेएमएफसी द्वितीय न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षातर्फे आरोप सिद्ध करता न आल्याने सोमवार दि. 21 रोजी न्यायालयाने 9 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. संभाजी भिडे गुरुजी, प्रदीप लक्ष्मण देसाई, विलास मोनाप्पा नंदी, दत्तात्रय गुणवंत पाटील, मधू गणपती पाटील, भोला उर्फ नागेंद्र हणमंत पाखरे, किरण गावडे, दुधाप्पा चांगप्पा बागेवाडी, लक्ष्मीकांत नारायण मोदगेकर अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. दरवर्षीप्रमाणे चांगळेश्वरी देवी यात्रेनिमित्त 12 एप्रिल 2018 रोजी येळ्ळूर कुस्तीगीर संघटनेच्यावतीने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणूक घोषित झाल्याने आचारसंहिता लागू होती.
सदर आखाड्यातर्फे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी भिडे गुरुजींनी आखाड्यात भाषण केल्याने आचारसंहितेचे उल्लंघन करण्यासह भाषिक द्वेष निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर कुस्ती आखाड्यावेळी ध्वनिक्षेपकासाठी परवानगी न घेता ध्वनिक्षेपक बसविणे, असा आरोप करत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या अधिकारी एस. बी. नाईक यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामुळे पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करून घेऊन न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बसवराज यमनाप्पा काजगल यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. या खटल्यातील 10 पैकी मारुती परशराम कुगजी यांचे निधन झाल्याने 9 जणांविरोधात खटला सुरू होता. न्यायालयात सरकार पक्षातर्फे 6 मुद्देमाल, त्याचबरोबर व्हिडिओ रेकॉर्डिंगची सीडी सादर करण्यात आली होती. मात्र सरकार पक्षाला आरोप सिद्ध न करता आल्याने न्यायालयाने वरील सर्व 9 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. योगायोग म्हणजे या खटल्याचा निकाल तब्बल 7 वर्षांनंतर चांगळेश्वरी देवीच्या यात्रेदिवशीच लागला आहे. सोमवार दि. 21 पासून येळ्ळूरच्या चांगळेश्वरी यात्रेला सुरुवात झाली आहे. या खटल्यात संशयितांतर्फे अॅड. श्यामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर यांनी काम पाहिले.









