येळ्ळूरच्या एका खटल्याचा निकाल : तब्बल 9 वर्षांनंतर मिळाला न्याय
बेळगाव : येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर येळ्ळूरच्या जनतेवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या खटल्यांची सुनावणी गेल्या 9 वर्षांपासून सुरू आहे. यामधील 167/15 या खटल्याची सुनावणी झाली असून यामधील सर्व 26 कार्यकर्त्यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये खटल्यांचे कामकाज सुरू झाले आहे. या खटल्यामध्ये फिर्यादीचे म्हणणे तसेच साक्षीदारांची साक्ष झाली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी सरकारी पक्षाला गुन्हा साबीत करता आला नाही. त्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली.
शांताराम कुगजी, सतीश कुगजी, राजू धामणेकर, अशोक धामणेकर, विनोद जाधव, रामा कुगजी, चंद्रकांत हंपण्णावर, शिवाप्पा हंपण्णावर, राहुल कुगजी, हेमंत नायकोजी, निलेश कुंडेकर, प्रकाश पाटील, उदय जाधव, चांगाप्पा कुगजी, श्रीधर जाधव, दिनेश घाडी, लक्ष्मण कुगजी, योगेश मजुकर, उमेश जाधव, मंजुनाथ हिरेमठ, महेश कुगजी, प्रशांत टक्केकर, सुरेश कुगजी, रामा पाटील, बबलु अष्टेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या 9 वर्षांपासून हे सर्वजण न्यायालयामध्ये हजर होते. मात्र साक्षीदार तसेच फिर्यादीदार अनुपस्थित राहिल्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. न्यायालयाने बुधवारी या सर्वांची निर्दोष मुक्तता केल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. महेश मोरे, अॅड. शंकर बाळनाईक, अॅड. विशाल चौगुले यांनी काम पाहिले.









