जवळपास 750 कोटी रुपयांमध्ये व्यवहार : नायकाला देणार टक्कर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिटेल मार्केटमधील आताच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे राधाकृष्णन दमानी होय. दमानी हे डी मार्टचे संस्थापक आहेत. त्यांनी नुकतेच ब्यूटी व पर्सनल केअर रिटेल साखळीमध्ये कार्यरत असणारा ब्रँड ‘हेल्थ अॅण्ड ग्लो’ याचे अधिग्रहण केले आहे. एका अहवालानुसार या अधिग्रहणासाठी तब्बल 700-750 कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून तो राजन रहेजा आणि हेमेंद्र कोठारी यांच्यासोबत झाल्याचे समजते.
2015 मध्ये बॉम्बे स्वदेशी स्टोअर्सनंतर दमानी यांनी हे दुसरे अधिग्रहण केले आहे. जे देशातील सर्वात जुने रिटेलर आहे. या स्टोअरची स्थापना ही स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक, मनमोहनदास रामजी आणि व्यावसायिक जेआरडी टाटा यांनी केली होती.
देशामध्ये 175पेक्षा अधिक स्टोअर्स
हेल्थ अॅण्ड ग्लो चे पहिले स्टोअर 1997 मध्ये चेन्नई येथे सुरु केले होते. यानंतर बेंगळूर, पुणे, मुंबई, कोलकाता, भोपाळ, भुवनेश्वर आणि हैदराबादसह अन्य 175 शहरांमध्ये स्टोरचा प्रारंभ करण्यात आला.
नायकासह अन्य ब्रँडला टक्कर
मार्केट रिसर्च संस्था युरोमॉनिटर आंतरराष्ट्रीय यांच्या अहवालानुसार 2023 च्या अंतिम कालावधीपर्यंत भारतामध्ये ब्यूटी अॅण्ड पर्सनल केअरचे बाजारमूल्य हे 1.50 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याचे संकेत आहेत. दमानी आता आगामी काळात व्यवसायामध्ये नायकासारख्या ब्रँडला टक्कर देणार आहे.
2002 मध्ये मुंबईत पहिले स्टोअर
डी-मार्टचे पहिले स्टोअर 2002 मध्ये मुंबईमध्ये सुरु झाले होते. 1999 मध्ये दमानी यांनी नवी मुंबई येथे नेरुळमध्ये आपली एक प्रेंचाइजीची सुरुवात केली होती. परंतु याला नंतरच्या काळात यश आले नाही.