जेएमएफसी न्यायालय आवारात पार्किंगसह वाहतूक कोंडी : आणखी एक गेट सुरू करण्याची वकिलांची मागणी
बेळगाव : जेएमएफसी न्यायालय आवारात पार्किंग समस्या निर्माण होण्यासह वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी बुधवारी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी न्यायालय आवाराला भेट देऊन वकिलांशी चर्चा केली. त्यावेळी ही समस्या सोडविण्यासाठी आणखी एक गेट बसविण्यात यावे, अशी मागणी वकिलांनी केली.
न्यायालयात दररोज वेगवेगळ्या खटल्यांच्या सुनावणीसाठी येणाऱ्या अशिलांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर न्यायाधीश, वकील, पोलीस व इतरांची वाहने न्यायालय आवारातच पार्क केली जातात. मात्र, आता न्यायालय आवारातील पार्किंगची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी बार असोसिएशनच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती.
त्यानुसार पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेण्यासाठी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांना गुरुवारी न्यायालयात पाठविले. त्या ठिकाणी फेरफटका मारून सद्यपरिस्थितीची त्यांनी पाहणी केली. सध्या असलेल्या एका गेटवर वाहनांचा भार वाढला आहे. त्यामुळे आणखी एक गेट सुरू केल्यास ही समस्या सुटण्यास मदत होईल, असे मत यावेळी वकिलांनी व्यक्त केले. या पर्यायाबाबत पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन यावेळी एसीपी निकम यांनी दिले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, अॅड. वाय. के. दिवटे, अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. मारुती कामाण्णाचे आदी उपस्थित होते.









