आल्त दाबोळीत पहाटे घडला अपघात, चालक जखमी, सुदैवाने अॅसिड गळती टळली
वास्को : आल्त दाबोळीतील नौदलाच्या डेपोसमोरील नाक्यावर दुचाकी स्वारांना वाचवण्याच्या प्रत्यनात अॅसिडवाहू टँकरांचा अपघात झाला. यात एका टँकरचा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात अॅसिड गळती टळली. अधिक माहितीनुसार वास्को शहरातून फॉसफेरीक असिडने भरलेले दोन टँकर झुआरीनगरातील पारादीप फॉसफेट या कंपनीच्या दिशेने एकामागोमाग निघाले होते. पहाटे दोनच्या सुमारास आल्त दाबोळीतील नौदलाच्या डेपोसमोरील नाक्यावर अचानक एक स्कुटर त्यांच्यासमोर आडवी आली. त्यामुळे पहिल्या टँकर चालकाला अचानक ब्रेक लावणे भाग पडले. टँकर चालकाने ब्रेक लावल्याने ती स्कुटर टँकरच्या धडकेपासून वाचली. मात्र, पुढचा टँकर अचानक थांबल्याने मागच्या टँकरने समोरील टँकरला मागून धडक दिली. त्यामुळे त्या टँकरच्या प्रथमदर्शनी भागाची पूर्णपणे हानी झाली. पूर्णपणे चेपल्या गेलेल्या टँकरच्या केबिनमध्ये त्या टँकरचा चालकही चिरडला गेला. या अपघातामुळे पहाटेच्या वेळीही लोक घटनास्ळी जमा झाले. या अपघाताची माहिती अग्नीशामक दलाला देण्यात आली. अग्नीशामक दलाने पाऊण तासाच्या प्रयत्नाने टँकरच्या केबिनमध्ये चिरडला गेलेल्या चालकाला बाहेर काढले. कटरच्या साहाय्याने पत्रा व लोखंड कापून चालकाला मोकळे करावे लागले. टँकर चालकाचे पाय या अपघात फ्रॅक्चर झाले आहेत. जी स्कुटर आडवी आल्याने हा अपघात झाला, त्या स्कुटरवर तिघे युवक होते. टँकरचालकाने ब्रेक लावल्याने ती तिघेही वाचले. परंतु मागच्या टँकरचा वेग जास्त असता तर दाबोळीत पहाटेच्या वेळी अॅसिड गळती झाली असती. वास्को पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









