आचरा पोलीसांची धडक कारवाई
आचरा : प्रतिनिधी
घराच्या बाहेर शेडमध्ये उभी केलेली मोटरसायकल चोरीस जाण्याची घटना मंगळवारी बुधवळे येथे घडली होती. याबाबत विजय शामसुंदर खरात यांनी तक्रार दाखल केल्यावर २४ तासाच्या आत आचरा पोलीसांनी धडक कारवाई करत संशयित मोटरसायकल चोराच्या खुडी, तालुका देवगड येथून मुसक्या आवळल्या आहेत. बुधवळे येथील विजय शामसुंदर खरात यांनी घराशेजारी शेडमध्ये उभी केलेली मोटरसायकल अज्ञाताने चोरुन नेण्याची घटना मंगळवार 25 जुलै रोजी बुधवळे येथे घडली होती. याबाबत मंगळवारी सायंकाळी खरात यांनी आचरा पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली होती.
चोरीस गेलेली मोटरसायकल ची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ;आचरा पोलीस स्टेशनचे संदीप कांबळे ,महेश देसाई, अक्षय धेंडे, मिलिंद परब, मनोज पुजारे, महेश जगताप, होमगार्ड योगेश पुजारे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. घटनास्थळापासून जवळच असलेल्या पिकनिक पॉईंटकडील उपस्थित असलेल्या काहीजणांकडे जाऊन पोलिसांनी मोटरसायकल बद्दल चौकशी केली असता एक अनोळखी व्यक्ती साधारणत: चोरीस गेलेल्या मोटरसायकल सारखी मोटरसायकल घेऊन तिथून पास झाला असल्याबाबतची माहिती मिळाली. सदर व्यक्ती बाबत अधिक चौकशी केली असता सदर व्यक्ती खुडी ,तालुका देवगड या ठिकाणी राहत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी सदर संशयित व्यक्ती गुरुदास आनंत मेस्त्री ,वय 33 वर्षे याला खुडी, ता- देवगड याला चोरीस गेलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले. तक्रार दाखल झाल्यापासून धडक कारवाई करत आचरा पोलीसांनी संशयितास चोवीस तासाच्या आत मोटरसायकल सह ताब्यात घेतल्याने आचरा पोलीसांच्या तत्परते बद्दल कौतुक होत आहे.









