पंतप्रधानांची माहिती ः अंतिम मुदतीच्या पाच महिने आधीच गाठले लक्ष्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने अंतिम मुदतीच्या पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘माती वाचवा आंदोलन’ या कार्यक्रमात त्यांनी यासंबंधी माहिती दिली. तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांचा उल्लेख करत भविष्यातील वाटचालीबाबतही महत्त्वाचे दिशानिर्देश दिले. दरम्यान, या उद्दिष्टपूर्तीनंतर आता सरकारने केलेल्या या सर्व उपाययोजनांमुळे ईबीपी कार्यक्रम 2025-26 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 2014 मधील 2 टक्क्मयांवरून आता 10 टक्क्मयांपर्यंत वाढले आहे. या इथेनॉल प्रमाण मिश्रणामुळे कार्बन उत्सर्जन 2.7 दशलक्ष टनांनी कमी झाले असून 41,000 कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे. इतकेच नाही तर देशातील शेतकऱयांना 40 हजार कोटी रुपयांचे उत्पन्नही मिळाले असल्याचे पंतप्रधानांनी याप्रसंगी नमूद केले. भारताने निर्धारित मुदतीच्या नऊ वर्षे अगोदर नॉन-जीवाश्म इंधनावर आधारित स्त्राsतांमधून स्थापित केलेल्या 40 टक्के वीज निर्मितीचे लक्ष्य गाठल्याबाबतही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
मोठय़ा देशांकडून पर्यावरणाची हानी
भारत पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करत आहे. तर हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य आहे. जगातील मोठमोठे देश केवळ नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी करत नाहीत, तर सर्वाधिक कार्बन उत्सर्जनही याच देशांमध्ये होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. स्वच्छ भारत मिशन, वेस्ट टू वेल्थ, अमृत मिशन अंतर्गत शहरांमध्ये आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे बांधकाम किंवा प्लास्टिकमुक्तीची मोहीम, नमामि गंगे अंतर्गत गंगा स्वच्छता मोहीम अशा विविध योजनांच्या माध्यमांमधून भारताने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी बहुआयामी काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरण संरक्षण लक्षात घेऊन योजना
गेल्या 8 वर्षांपासून देशात सुरू असलेल्या सर्व योजनांमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आग्रह आहे, याचे मला समाधान आहे. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य असताना भारत हा प्रयत्न करत आहे. जगातील मोठमोठे आधुनिक देश पृथ्वीवरील अधिकाधिक संसाधनांचा केवळ शोषण करत नाहीत तर सर्वाधिक कार्बन उत्सर्जनही करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर, भारताने सीडीआरआय आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या निर्मितीचे नेतृत्व केले आहे. भारताने 2070 पर्यंत नेट झिरोचे लक्ष्य गाठण्याचा संकल्पही गेल्यावषी केल्याचे पंतप्रधान म्हणाले.
22 कोटींहून अधिक मृदा आरोग्य पत्रिकांचे वितरण
पूर्वी आपल्या देशातील शेतकऱयाला आपल्या शेतातील मृदा कोणत्या प्रकारची आहे, जमिनीत काय कमतरता आहे, सुपिकता किती आहे याची माहिती मिळतच नव्हती. या समस्येवर मात करण्यासाठी देशातील शेतकऱयांना मृदा आरोग्यपत्रिका देण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली. देशभरातील शेतकऱयांना 22 कोटींहून अधिक मृदा आरोग्य कार्ड देण्यात आले. यासोबतच देशात माती परीक्षणाशी संबंधित एक मोठे नेटवर्कही तयार करण्यात आले आहे. आज देशातील करोडो शेतकरी मृदा आरोग्य पत्रिकेवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे खत आणि सूक्ष्म पोषणाचा वापर करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.









