जुन्या छत्र्या दुरुस्तीला अधिकतर पसंती : नागरिकांची वर्दळ
बेळगाव : मागील चार दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने पावसाळी साहित्याची दुरुस्ती वाढली आहे. विशेषत: पावसापासून संरक्षण करणाऱ्या छत्री दुरुस्तीला वेग आला आहे. पावसामुळे छत्री दुरुस्तीला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. शहरातील विविध भागात छत्री दुरुस्तीची कामे केली जात आहेत. यंदा जूनपासून म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे छत्री, रेनकोट आणि इतर साहित्य अडगळीत पडले होते. मात्र, आता जोरदार पावसाला सुरुवात होताच छत्री, रेनकोट आणि इतर पावसाळी साहित्य नागरिकांनी वापरात आणले आहे. विशेषत: जुन्या छत्र्यांची दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे छत्री दुरुस्तीदारांकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. शहराच्या वर्दळीच्या अनेक ठिकाणी छत्री दुरुस्तीचे काम कारागीर करू लागले आहेत. यंदे खूट, काकतीवेस, धर्मवीर संभाजी चौक, क्लब रोड, बसस्टँड रोड, रेल्वेस्टेशन रोड यासह इतर ठिकाणीही छत्री दुरुस्ती केली जात आहे. पावसाला वेग आल्याने नादुरुस्त छत्र्या दुरुस्त केल्या जात आहेत. साधारण 300 ते 500 रुपयांपर्यंत छत्र्यांच्या किमती आहेत. त्यामुळे काही नागरिक जुन्याच छत्र्या दुरुस्त करून वापरण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे छत्री दुरुस्तीला वेग आल्याचे दिसत आहे.









