ओल्या पार्ट्यांचे आयोजन, अनेक धाबे-हॉटेल्सचे बुकिंग, स्टार्टरपासून जेवणापर्यंत ताव
प्रतिनिधी/ बेळगाव
निवडणुका आल्या की जिभेचे चोचले आणि तळीरामांची सोय केली जाते. हे काही नवखे नाही. मात्र यावेळची निवडणूक एक वेगळीच टोकाला जाऊन पोहोचली आहे. राष्ट्रीय पक्षांना म. ए. समितीच्या निष्ठावंत मतदारांनी चांगलेच जेरीस आणले आहे. त्यामुळे काही तळीराम आणि दलबदलू कार्यकर्त्यांना आमिषे दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे शहराबरोबरच उपनगर, तालुक्यातील धाबे, हॉटेल्स गर्दीने फुल्ल होऊ लागली आहेत. आज एकाची तर उद्या दुसऱ्याची आणि परवा तिसऱ्याची असे म्हणत काहीजण ताव मारणे आणि झिंगणे यातच धन्यता मानत आहेत.
या निवडणूक काळात सोशल मीडियावर बऱ्याच चित्रपटांतील प्रसंग प्रसारित केले जातात. बिन कामाचा नवरा या मराठी चित्रपटातील निवडणुकीच्या काळातील काही प्रसंग प्रसारित करून त्याचप्रकारे आपणही निवडणूक काळात मौजमजा करू, असे म्हणत उमेदवारांच्या समर्थकांना चांगलेच जेरीस आणत आहेत. निवडून आल्यानंतर अमाप संपत्ती जमा करता येते. मात्र आता निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करण्याची तयारी यापूर्वीच अनेकांनी केली आहे. खर्च करण्याचे टार्गेटच अनेक उमेदवारांनी निश्चित केले आहे. हे टार्गेट निश्चित करताना कशासाठी किती रक्कम खर्च करायची? याचा लेखाजोखाही तयार झाला आहे.
त्यानुसार काहीही करा मात्र मतदारांना आपल्याकडे वळवा, असे उमेदवार आपल्या समर्थकांना सांगत आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक अशा दलबदलू कार्यकर्त्यांना रात्रीच्या जेवणावळी करण्यासाठी आमंत्रण देत आहेत. आमंत्रण म्हणजे शाही थाटच. केवळ जेवण नाही तर स्टार्टरपासून सर्व सोय झाली पाहिजे, असे पार्टीला जाण्यापूर्वीच सांगितले जात आहे. त्यामुळे स्टार्टर आणि मद्याचा पेला संपतो न संपतोच जेवणाचा बेत आखला जातो. काहीसे जेवण करायचे ताटात उरलेले सोडायचे. मात्र मस्तपैकी तोंडावर हात फिरवून निघायचे. घरातील मंडळीही जेवण बाहेरच करून येत आहेत, त्यामुळे त्यांनाही बरेच वाटत आहे.
आता निवडणूक आहे, प्रचार करायलोय, त्यामुळे उशीर होणार, आम्ही जेवण करून येणार, असे फोनवर सांगणारे अनेक कार्यकर्ते आपणाला जागोजागी दिसत आहेत. एकूणच 10 मेपर्यंत दलबदलू कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ आहे. यावेळी चर्चादेखील वेगवेगळ्या रंगलेल्या असतात. आपलं ठरलेलं आहे. मात्र आम्ही साऱ्यांचे आहोत, असे सांगतात. हे देखील त्याठिकाणी ऐकायला मिळते. या सर्वांमध्ये कधी न चालणारे धाबे आणि हॉटेल्सदेखील काही प्रमाणात उलाढाल करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनाही बऱ्यापैकी दिलासा मिळत आहे.
मे 10 रोजी विधानसभेचे मतदान होणार आहे. त्यामुळे अजून 18 दिवस उमेदवारांच्या जेवणावळी सुरू राहणार आहेत. त्यामुळे 18 दिवस हे या कार्यकर्त्यांना मोलाचे आहेत. या 18 दिवसांत मनसोक्त जेवण करणे आणि इतर मजा करणे यासाठी नियोजन सुरू आहे. अर्ज भरणी झाली आहे. आता प्रचाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा मेनू ठरविताना हे दलबदलू कार्यकर्ते दिसत आहेत. काही पक्षातील तसेच स्थानिक अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते मात्र निष्ठावानपणे प्रचार करून घरी जेवण करत आहेत.A









