बिहारमध्ये शोककळा : राम मंदिर ट्रस्टचे संस्थापक सदस्य
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे सुप्रसिद्ध समाजसेवक आणि माजी आयपीएस अधिकारी आचार्य किशोर कुणाल यांचे रविवारी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बिहारमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे समर्थक आणि हितचिंतक दु:खी झाले आहेत. कुणाल यांच्या पार्थिवावर सोमवारी हाजीपूर येथील कौनहरा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आचार्य किशोर कुणाल हे महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव आणि अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. दलित आणि मागास लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या कुणाल यांनी बिहारमध्ये अनेक सामाजिक कामेही केली होती. तिरहुत येथील ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या किशोर कुणाल यांनी पाटणा विद्यापीठातून इतिहास आणि संस्कृतमध्ये पदवी प्राप्त केली. 1972 मध्ये त्यांनी भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) प्रवेश केला आणि गुजरात केडरमध्ये सेवा दिली. त्यानंतर 1983 मध्ये त्यांना पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक बनवण्यात आले. 2001 मध्ये त्यांनी स्वेच्छेने आयपीएस पदाचा राजीनामा दिला आणि स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले.
आयपीएसमधून निवृत्त झाल्यानंतर कुणाल यांनी बिहार राज्य धार्मिक न्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. पाटणाच्या प्रसिद्ध महावीर मंदिर ट्रस्टचे ते सचिवही होते. त्यांच्या सचिवपदाच्या कार्यकाळातच महावीर मंदिराचा जीर्णोद्धार आणि अनेक सामाजिक कामे झाली. महावीर ट्रस्टने नंतर महावीर कॅन्सर इन्स्टिट्यूट, महावीर आरोग्य संस्था आणि महावीर नेत्रालय अशा अनेक संस्था स्थापन केल्या. आजही या संस्थांच्या माध्यमातून गरिबांना आरोग्य सेवा पुरविल्या जातात.









