वार्ताहर/लांजा
येथील ठेकेदारी फर्म यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे (Yash Construction Company) बँक खाते हॅक (bank account hacked) करून त्यातील 92 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अब्दुल मुजित मोतीआर (Abdul Mujit Motiar) (38, रा .बुरुज बजबज, जि. साऊथ, पश्चिम बंगाल) याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सायबर हॅकरने आधी कंपनीच्या मालकाचे सीमकार्ड बंद केले. त्यानंतर कंपनीच्या बँक खात्यातून 4 ऑक्टोबरला सकाळी 11.30 ते 12 च्या सुमारास अवघ्या 30 मिनिटांत बँकेचे स्टार टोकन ॲप हॅक करून 92 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारला. हा प्रकार 7 ऑक्टोबरला लक्षात आल्यानंतर मालकाने लांजा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. याविषयी पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवल्यानंतर बँक खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात जमा केल्याचे लक्षात आले. ज्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली, ते पश्चिम बंगाल येथील असल्याचे लक्षात आले. लांजा पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, नासीर नावळेकर, मंगेश कोलापटे यांचे पथक पश्चिम बंगालमध्ये तातडीने रवाना झाले होते.
हे ही वाचा : ऐन दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ वाटप
पश्चिम बंगाल येथील पोलिसांची मदत घेत या पथकाने पैशांच्या व्यवहारात संशयित आरोपी अब्दुल मुजित मोतीआर याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे करत आहेत.









