ऑस्ट्रेलियातील घटना : सर्व पीडितांचे वय 10 वर्षांपेक्षा कमी
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियात 25 वर्षांमध्ये लैंगिक शोषणाचे 1,623 गुन्हे करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 45 वर्षीय आरोपीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. संबंधित आरोपी देशातील तीन शहरांमध्ये चाइल्ड केयर ऑफिसर राहिला होता असे सांगण्यात आले आहे. आरोपीने 91 मुलींवर बलात्कार केला होता. ऑस्ट्रेलियातील कायद्यानुसार आरोपी विरोधात विविध कलमांखाली गुन्हे नेंदविण्यात आले आहेत.
आरोपीच्या कृत्याविषयी पोलिसांना पहिल्यांदा 2014 मध्ये सुगावा लागला होता. परंतु अटक करण्यास आता यश मिळाले आहे. आरोपीकडून हजारो चाइल्ड पोर्नोग्राफी व्हिडिओ, फोटोज अन् काही रील्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर आरोपीकडून बलात्कार करण्यात आलेल्या सर्व पीडितांचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे. माजी चाइल्ड केयर ऑफिसरने एकूण 246 वेळा बलात्कार केला आहे. यादरम्यान त्याने 613 चाइल्ड पोर्न व्हिडिओ तयार केले आहेत. हे सर्व गुन्हे 2007-2022 दरम्यान तीन शहरांमधील 12 चाइल्ड केयर सेंटर्समध्ये झाले आहेत. आरोपी स्वत: चाइल्ड केयर एक्सपर्ट होता आणि याच आधारावर त्याला या केंद्रांमध्ये सहजपणे नोकरी मिळत होती.
आतापर्यंतच्या चौकशीनुसार पीडितांपैकी 87 जणी ऑस्ट्रेलियन मुली आहेत. या मुलींची ओळख पटवून त्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे जबाब नोंदवून घेतले जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपीला ऑगस्ट 2022 मध्येच अटक करण्यात आली होती, परंतु तेव्हा त्याच्या विरोधात ठोस पुरावे मिळाले नव्हते. यानंतर पोलिसांनी अनेक पथकांची स्थापना करून पुरावे जमविण्यावर लक्ष केंद्रीत केले. पोलिसांकडे आता अनेक ठोस पुरावे आहेत.
कसा लागला सुगावा?
2014 मध्ये पोलिसांना एका प्रकरणाच्या चौकशीदरम्यान या लैंगिक गुन्ह्यांसंबंधी पहिला सुगावा लागला होता. डार्क वेबवर काही चाइल्ड पोर्न व्हिडिओ अन् फोटोज आढळून आल्या होत्या. संशय वाटल्याने तपास करण्यात आला असता याचे चित्रण ऑस्ट्रेलियन चाइल्ड केयरमध्ये करण्यात आल्याचे दिसून आले होते. यानंतर गुन्हा नोंदवून घेत आरोपीचा शोध हाती घेण्यात आला. आरोपीला आता 12 ऑगस्ट रोजी ब्रिस्बेनच्या न्यायालयात हजर केले जाईल. चौकशीसाठी पोलीस या आरोपीला अन्य काही देशांमध्ये नेणार असल्याचे मानले जात आहे.









