पुणे / वार्ताहर :
मार्केटयार्ड पोलिसांच्या कोठडीत असलेला आरोपी संतोष पवार (वय 23, रा. खानापूर) हा 3 फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांना मारहाण करून फरार झाला होता. शोधमोहिमेदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे तो पोलिसांच्या हाती लागला.
आरोपी संतोष पवार याच्यावर मोक्का कायद्यांर्गत गुन्हा दाखल असून, त्याला त्याच्या साथीदारांसह तपासकामी येरवडा कारागृहातून मार्केटयार्ड पोलिसांनी 24 जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. 1 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी संतोष पवार व साई राजेंद्र कुंभार या दोन आरोपींना तपासासाठी लॉकअपमधून काढून त्यांच्या राहत्या घरी घरझडती घेण्यासाठी खानापूरला घेऊन गेले होते. आरोपी साई कुंभार याच्या घराची पोलीस झडती घेत असताना संतोष पवार तपास अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण करुन तीन साथीदारांच्या मदतीने तो पळून गेला होता. याबाबत पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधिक वाचा : उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश नाही
आरोपीच्या तापासासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली. तपासादरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे पवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेऊन आरोपी पवारला ताब्यात घेण्यात आले. याबाबत पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.









