लोणावळा : मावळ तालुक्यातील एका महिलेला तीन वेगवेगळय़ा मोबाईल क्रमांकावरून फोन करत माझ्याकडे तुझे खासगी फोटो आहेत. मला 30 लाख रुपये दे, नाहीतर ते फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करेन अशी धमकी देण्यात आली होती. महिलेच्या तक्रारीनंतर वडगाव मावळ पोलिसांनी आरोपीला वाशिममधून अटक केली.
देवानंद शंकर भोंगड (वय 29 वर्षे रा. वनोणा, ता. मंगळुरू पीर, जिल्हा वाशिम) असे या आरोपीचे नाव आहे. देवानंद हा मजूर असून, गुन्हयातील फिर्यादी महिलेकडून आरोपीच्या मोबाईल फोनवर चुकून मिस्डकॉल गेला होता. त्यामुळे आरोपीला फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर प्राप्त झाला. त्यानंतर तो वारंवार फिर्यादी महिलेला मोबाईलवर फोन करून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. नंतर आरोपीने फिर्यादी यांना माझ्याकडे तुमचे खासगी फोटो आहेत. मी तुमचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करेन, तसेच तुमच्या लहान मुलीला किडनॅप करेन, अशी धमकी देत महिलेकडे 30 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादी महिलेचे घरातील लोक भयभित झालेले होते.
फिर्यादी महिलेस आरोपीकडून होणारा त्रास असहाय्य झाल्याने त्यांनी वडगाव मावळ पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी घटनेचे गांभीर्य जाणून अज्ञात आरोपीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून, तांत्रिक तपास चालू केला. यामध्ये तीन वेगवेगळ्या मोबाईल फोनवरून धमकी देणारा आरोपी हा वाशिम जिह्यातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे पोलिसांच्याच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीचे नाव पत्ता निष्पण करून त्याला वाशिममध्ये जाऊन अटक केली. त्याच्याजवळील मोबाईल फोन व तीन सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.








