सातारा, फलटण :
विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीतून रेकॉर्डवरील आरोपीला बनावट गावठी कट्ट्यासह फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. अजय कल्लु बेनकर (रा. धुळदेव ता. फलटण) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक महाडिक यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार हा बुधवारी विडणी गावच्या हद्दीत फलटण ते पंढरपूर रोडवर बसस्टॉपजवळ उभा आहे. आणि त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा बाळगुन वावरत आहे. तो विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक महाडिक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी. बी. बदने, पोलीस हवालदार नितीन चतुरे, वैभव सुर्यवंशी, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हणुमंत दडस, शिवराज जाधव यांनी या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई • विडणी गावच्या हद्दीतून घेतले ताब्यात जावुन छापा टाकण्याचा आदेश देऊन कारवाई करण्यास सांगितले. या ठिकाणी गेल्यावर एक इसम संशयितरित्या वावरताना आढळुन आला. त्याला पोलिसांची चाहुल लागल्याने तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस नाईक श्रीनाथ कदम यांनी झडप मारुन पकडुन ताब्यात घेतले. त्याच्या कंबरेला गावठी बनावटीचा कट्टा व त्याच्या खिशातील एक जिवंत काडतुस व एक रिकामी पुंगळी मिळुन आली. या गावठी कट्ट्यामधून एक गोळी फायर केल्याची दिसुन आली. या कट्ट्याबाबत विचारपूस केली असता त्याने भंगार काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराकडुन घेतलेली असल्याचे सांगितले. हे गावठी कट्टा, जिवंत काडतुस, रिकामी पुगळी जप्त केली आहे.








