‘आई मी कुरकुरे चोरले नाहीत’ असा वहीत उल्लेख
वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पांशकुडा येथे एक हादरवून टाकणारी घटना समोर आलीआहे. 13 वर्षीय कृष्णेंदु दासने चोरीचे खोटे आरोप झाल्यावर आत्महत्या केली आहे. कृष्णेंदु हा बकुलदा हायस्कूलमध्ये इयत्ता 7वी शिकत होता. चोरीचा आरोप झाल्यावर बुधवारी रात्री त्याने किटकनाशकाचे प्राशन केले होते आणि गुरुवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक दुकानदार शुभंकर दीक्षितने कृष्णेंदुवर तीन पाकिट चिप्स चोरल्याचा आरोप केला होता. रस्त्यावर पडलेले पाकीट उचलल्याचे कृष्णेंदुने दुकानदाराला सांगितले होते. तरीही दुकानदाराने त्याला दुकानासमोर कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले. यानंतर त्याच्या आईने देखील त्याला सर्वांसमोर ओरडले होते.
या घटनेमुळे अत्यंत दु:खावलेल्या गेलेल्या कृष्णेंदुने आत्महत्या केली आहे. कृष्णेंदुने एक सुसाइड नोट लिहिली होती, कृष्णेंदुने स्वत:च्या वहीत ‘आई मी कुरकुरे चोरले नाही, ते मला रस्त्यावर पडलेले मिळाले होते, मी चोरी केली नाही’ असे लिहिले होते. तर पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. दुकानदार शुभंकर दीक्षित हा नागरिक स्वयंसेवक देखील असून तो घटनेनंतर फरार झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह परिवाराला सोपविण्यात आला. याप्रकरणी अद्याप कुठलीच लेखी तक्रार नोंद झालेली नाही, परंतु पोलीस याप्रकरणी तपास करत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले आहे, यात दुकानाबाहेर पडलेले चिप्सचे पाकीट उचलताना मुलगा दिसून येत आहे.









