अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह अडचणीत ः दिग्गज कुस्तीपटूंची निदर्शने
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाला विरोध करून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह चांगलेच अडचणीत आले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट यांच्यासह देशातील अनेक मल्ल बुधवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनास बसले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार देखील आहेत.
कुस्ती प्रशिक्षकही महिला खेळाडूंचे शोषण करतात, याच्या विरोधात आम्ही आवाज उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई आम्ही अखेरपर्यंत लढू आणि बृजभूषण सिंह यांना पदावरून दूर केले जात नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही असा इशार आंदोलकांनी दिला आहे.
प्रशिक्षक महिला खेळाडूंसोबत अन्याय करत आहेत. कुस्ती महासंघाचे काही प्रशिक्षक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात. एवढेच नाही तर बृजभूषण सिंह यांनीही अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. माझे शोषण झाले नसले तरीही लैंगिक शोषण झालेल्या अनेक महिला खेळाडूंना ओळखते. बृजभूषण यांना पदावरून हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप करावा असे विनेश फोगाटने म्हटले आहे. जंतर मंतरवर आंदोलनासाठी जमलेल्या अन्य मल्लांनी देखील बृजभूषण सिंहांवर गंभीर आरोप केले आहेत.
कुस्ती महासंघ आमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत आहे. आमचा छळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही ऑलिम्पिकसाठी बाहेर गेलो असता आम्हाला फिजियो कोच देण्यात आला नव्हता. याच्या विरोधात आवाज उठविल्यावर आम्हाला धमकी देण्यात येत असल्याचे या आंदोलक मल्लांनी म्हटले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी पराभूत झाल्यावर बृजभूषण सिंह यांनी मला ‘नकली नाणे’ असल्याचे म्हणत हिणवले. त्यांनी माझे मानसिक खच्चीकरण केले. यामुळे मी दररोज माझे आयुष्य संपविण्याचा विचार करायचे. आमच्यापैकी एकाही मल्लाला काही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी बृजभूषण सिंह यांची असेल असे विनेश फोगाट म्हणाली.
कुस्ती महासंघाची बेबंदशाही
भारतातील अनेक दिग्गज मल्लांनी बुधवारी दिल्लीत कुस्ती महासंघाच्या विरोधात आंदोलन केले. यात बजरंग पुनियाचाही समावेश आहे. कुस्ती महासंघ मल्लांना त्रास देण्याचे काम करत आहे. कुस्ती महासंघाचे प्रशासन चालविणाऱयांना या खेळाविषयी कुठलेच ममत्त्व नाही. आम्ही आता ही हुकुमशाही आणखी सहन करणार नसल्याचे बजरंगने म्हटले आहे. कुस्ती महासंघाच्या बेबंदशाही विरोधात आम्ही एकवटलो आहोत. सर्व मल्ल आमच्या पाठिशी असल्याचे ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने सांगितले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली भेट
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी जंतर-मंतर येथे जात महिला कुस्तीपटूंची भेट घेतली आहे. देशाचा गौरव वाढविणाऱया या मल्लांना कडाक्याच्या थंडीत आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी असल्याचे मालिवाल यांनी म्हटले आहे. याप्रकरणी महिला आयोगाने दिल्ली पोलीस आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. तसेच मालिवाल यांनी बृजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
..आरोप खरे ठरल्यास गळफास घेईन
अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांनी आरोप करणाऱयांना आव्हान दिले आहे. जर आरोप सिद्ध झाले तर मी गळफास लावून खेईन. लैंगिक शोषणाची कुठलीच घटना घडलेली नाही. सर्व आरोप निराधार आहेत. 97 टक्के मल्ल माझ्यासोबत आहेत. मी झेड शेणीची सुरक्षा प्राप्त खासदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









