कटक :
ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यात एका पित्याने स्वत:च्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची हत्या केली आहे. पीडित मुलीचे वय 10 वर्षे आहे. ही मुलगी स्वत:च्या पित्यासोबत कालव्याच्या ठिकाणी गेली होती. तेथे स्नान केल्यावर ती काही अंतरावर शौचासाठी गेली असता 27 वर्षीय इसमाने तिच्यावर हल्ला केला होता. तिची आरडाओरड ऐकून पिता तेथे पोहोचला आणि त्याने जवळ असलेला एक दगड उचलून हल्लेखोरावर वार केला, यामुळे हल्लेखोराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या पित्याने पोलीस स्थानकात जात घडलेला प्रकार सांगत आत्मसमर्पण केले आहे. पोलीस आता याप्रकरणी तपास करत असून हा प्रकार स्वत:च्या मुलीला बलात्कारापासून वाचविताना झाला असल्याने तिच्या पित्यावर कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक लोकांकडून केली जात आहे.









