लंडन-न्यूयॉर्क फ्लाइटमध्ये घडविला होता स्फोट ः 270 बळी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
1988 मध्ये लंडनहून न्यूयॉर्कला जात असलेले विमान पॅन एम 103 मध्ये स्फोट घडवून आणणाऱया आरोपीला अमेरिकेने रविवारी जेरबंद केले आहे. 34 वर्षांपूर्वी स्कॉटलंडच्या लॉकरबीमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात विमानातून प्रवास करणाऱया 259 जणांना जीव गमवावा लागला होता. याचबरोबर विमानाचे अवशेष कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता. इंग्लंडच्या सीमेत झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.
या आरोपीचे नाव अबु अगेला मसूद खैर अल-मरीमी असून तो लीबियाचा नागरिक आहे. स्कॉटलंडच्या क्राउन ऑफिसनुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
2020 मध्ये दहशतवादी हल्ल्याला 32 वर्षे पूर्ण झाल्यावर अमेरिकेने मसूद विरोधात नवे आरोप निश्चित केले होते. याच्या 2 वर्षांनी 11 डिसेंबर रोजी अमेरिकेने त्याला ताब्यात घेतले आहे. अनेक अमेरिकन तसेच अन्य देशांच्या नागारिकांचा जीव घेणाऱया आरोपीला अखेर शिक्षा होणार असल्याचे अमेरिकेचे ऍटर्नी जनरलनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
लीबियातील गुप्तचर यंत्रणेला मसूदने दिलेली मुलाखत 2017 मध्ये अमेरिकेच्या अधिकाऱयांच्या हाती लागल्यावर 1988 च्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीला नवे वळण मिळाले. ही मुलाखत 2012 मध्ये गद्दाफी राजवट कोसळल्यावर घेण्यात आली होती. त्यावेळी गुप्तचर यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले होते. पॅन एम फ्लाइट 103 मध्ये हल्ल्यासाठी बॉम्ब तयार केल्याची कबुली त्याने या मुलाखतीत दिली होती. या हल्ल्याच्या कटात लीबियाच्या गुप्तचर यंत्रणेचाही हात होती. गद्दाफीने हल्ल्यासाठी मसूद अन् त्याच्या सहकाऱयांचे आभार मानले होते.
पॅन एम फ्लाइट 103 मध्ये झालेल्या हल्ल्यासाठी लीबियाच्या गुप्तचर यंत्रणेच्या दोन हस्तकांवर आरोप ठेवण्यात आले होते. यात अब्दुल बासित अल-मगराही आणि लामेन खलीफा फहिमा यांचा समावेश होता. फहिमा याच्यावरील आरोप सिद्ध झाले नव्हते. मगराही दोषी ठरला होता, परंतु कर्करोगाने पीडित असल्याने 2009 मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. 2012 मध्ये लीबियात त्याचा मृत्यू झाला होता.









