14 वर्षांनंतर झाली होती अटक : हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा गुन्हा
वृत्तसंस्था/ ग्वाटेमाला सिटी
2008 साली निकारागुआ येथून ग्वाटेमालाच्या दिशेने जात असलेल्या एका बसचे ग्वाटेमालाच्या क्षेत्रात अपहरण करण्यात आले होते. अमली पदार्थांची तस्कीर करणाऱ्या गुन्हेगारांनी स्वत:चा म्होरक्या रिगोबर्टो डेनिलो मोरालेसच्या नेतृत्वात हा गुन्हा केला होता. रिगोबर्टोने या बसमधून प्रवास करणाऱ्या 16 जणांवर गोळ्या झाडल्या होत्या. मग बस अन्यत्र नेत सर्व मृतदेह जाळण्यात आले होते. या घटनेच्या 16 वर्षांनी म्हणजेच 23 जानेवारी 2024 रोजी ग्वाटेमालाच्या एका न्यायालयाने रिगोबर्टो डेनिलो मोरालेसला 808 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
प्रत्येक हत्येसाठी रिगोबर्टोला 50 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचाच अर्थ 16 हत्यांसाठी त्याला 808 वर्षांची शिक्षा झाली आहे. उर्वरित 8 वर्षांची शिक्षा त्याला अन्य गुन्हेगारी कृत्यांसाठी ठोठावण्यात आली आहे.
2008 मध्ये रिगोबर्टो डेनिलो मोरालेस आणि त्याचे साथीदार बसमध्ये अमली पदार्थांची चोरी करण्याच्या उद्देशाने चढले होते. या बसमधून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती मोरालेसला मिळाली होती. परंतु बसमध्ये अमली पदार्थ न मिळाल्याने रिगोबर्टोने सर्व प्रवाशांची हत्या केली होती.
16 जणांची हत्या केल्यावर त्यांचे मृतदेह त्याने स्वत:चा मित्र मार्विन मोंटिएल मारिन याच्या ठिकाणावर नेले होते. तेथे बससोबत सर्व मृतदेह जाळण्यात आले होते. न्यायालयाने या गुन्ह्यात सामील सर्व दोषींना कठोर शिक्षा सुनावली आहे.
2008 मध्ये 16 जणांची हत्या केल्यावर मोरालेस फरार झाला होता. 14 वर्षांपर्यंत त्याला अटक करण्यास पोलिसांना यश मिळाले नव्हते. 2022 मध्ये अखेर पोलीस मोरालेसला अटक करण्यास यशस्वी ठरले होते. त्याचवर्षी त्याच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती.









