ऑनलाईन टीम / तरुण भारत :
माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री कात्रजमध्ये शिवसैनिकांनी हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शहर प्रमुखासह 5 जणांना अटक केली होती. त्यांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद निष्ठा यात्रा काल रात्री 8 वाजता कात्रजमध्ये आली होती. त्यानंतर कात्रज चौकातील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत असताना तेथून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्रभर धरपकड करुन शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, बबन थोरात आणि संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांना अटक केली होती. या प्रकरणात अटक आरोपींवर 353, 120, 307, 332 कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आज पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
काल रात्री आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी कात्रजमध्ये शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज पुण्यात होते. सामंत हे आज दिवसभर शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकात असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. सामंत हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच आदित्य यांची सभा संपवून निघालेल्या शिवसैनिकांच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडली. या प्रचंड गर्दीस आवरणे पोलिसांनाही कठीण जात होते. संतप्त शिवसैनिकांनी चपला, बाटल्यासह सामंत यांच्या कारवर दगडांचा मारा केला. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटून गाडीतील एक जण जखमी झाला आहे.
हेही वाचा : गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षातून एकदाच घ्यावी लागणार परवानगी








