तक्रारदाराचा विसंगत जबाब
मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा निकाल
रत्नागिरी/प्रतिनिधी
चोरीच्या खटल्यात तक्रारदार वगळता अन्य साक्षीदार सरकारी पक्षाकडून तपासण्यात न आल्याने चौघा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. शहरातील अजमेरीनगर मजगांवरोड येथील टपरी फोडून बॅटरी कन्व्हर्टन व रोख रक्कम 2 हजार रूपये चोरून नेल्याचा आरोप चौघाजणांवर ठेवण्यात आला होता. न्यायालयापुढे तक्रारदाराचा विसंगत जबाब व अन्य साक्षीदार तपासले गेले नसल्याने न्यायालयाने आरोपींची मुक्तता केले.रत्नागिरी मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे यांनी या खटल्याचा निकाल दिला.
लुबनान उर्फ अली कासिमसाब तहसिलदार (33, रा. कोकणनगर रत्नागिरी), शादाब ताजदार वाडकर (21, रा. किर्तीनगर रत्नागिरी), सुबहान कालिम खले (21, रा. कोकणनगर रत्नागिरी) व हुजेफ अल्ताफ शिरगांवकर (21, ऱा किर्तीनगर रत्नागिरी) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खटल्यातील माहितीनुसार,शहरातील मजगांव रोड अजमेरीनगर येथील जनरल स्टोअरची टपरी चोरटय़ांनी फोडल्याची घटना 15 फेबुवारी 2021 रोजी सकाळी उघडकीस आली होते.दुकानातील 7 हजार रूपये किंमतीची बॅटरी व 2 हजार रूपयांची रोकड चोरीला गेली,अशी तक्रार दुकानाचे मालक शौकत अहमद सोलकर (रा. किर्तीनगर रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती.








