प्रतिनिधी/ बेळगाव
पिरनवाडी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या दोघाजणांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

पूर्ववैमनस्यातून बर्थ डे पार्टीसाठी बोलावून अरबाज रफिक मुल्ला (वय 22) रा. पिरनवाडी या तरुणाचा खून करण्यात आल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले होते. बेळगाव ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी खुनाच्या घटनेनंतर केवळ काही तासांत दोघाजणांना अटक केली आहे.
प्रसाद नागेश व•र व प्रशांत रमेश कर्लेकर दोघेही राहणार पिरनवाडी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना शनिवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
गुरुवार दि. 13 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसाद व प्रशांत या दोघाजणांनी अरबाजच्या घरी जाऊन त्याला बर्थ डे पार्टीसाठी म्हणून घेऊन गेले होते. त्यानंतर तो आपल्या आजीच्या घरी परतला नव्हता. दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 14 जुलै रोजी सकाळी जैन कॉलेजजवळील झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला होता. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









