जालना जिह्यातील ऍड. किरण लोखंडे यांचा झाला होता खून
प्रतिनिधी/ सातारा
जालना जिह्यातील ऍड. किरण लोखंडे यांच्या खुनाच्या गुह्यातील फारार असलेला आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. विकास गणेश म्हस्के असे त्यांचे नाव आहे. तो खून झाल्यापासून तो फरार होता. त्याला शहरातील मोळाचा ओढा परिसरातून अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जालना जिल्हयातील जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे राहणाऱया मनिषा किरण लोखंडे यांचा विवाह ऍड. किरण लोखंडे यांच्याशी मे 2022 मध्ये झाला होता. अवघ्या चार महिन्यातच त्या दोघांमध्ये भांडणे वाढली. त्यामुळे मनिषा किरण लोखंडे हिने तिचा साथिदार गणेश मिठू आगलावे (रा. वाल्हा ता. बदनापूर जि.जालना) व विकास गणेश म्हस्के (रा. आनंदनगर अंजठा कॉलेज पाठमागे जालना) यांच्या मदतीने दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री ऍड. किरण लोखंडे यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करुन, त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांचा खुन केला. व मृतदेह घरामध्ये ठेवून निघुन गेले. त्यांनतर दि. 01 सप्टेंबर 2022 रोजी दोघे पुन्हा घरी आले. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करीत असतानाच त्यांनी घरातील स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरची पाईप काढून रेग्युलेटर चालू ठेवून काडी लावली. त्यामुळे गॅसने पेट घेवून स्फोट झाला. त्यामध्ये ऍड. किरण लोखंडे यांचा मृतदेह जळाला असल्याचा दोघांनी बनाव केला. पतीचा मृत्यू झाल्या बाबत पत्नीने पोलीसांना माहिती दिल्याने सदर बाबत आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असल्याने या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
विकास गणेश मस्के हा रविवारी सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरामध्ये येणार आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजें यांचे मार्गदशनाखाली एक पथक तयार केले. व गणेश याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. स. पो. नि रमेश गर्जे व पथकाने मोळाचा ओढा परिसरामध्ये सापळा लावून आरोपी विकास याला ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी जालना तालुका पोलीसांचे ताब्यात दिले आहे. या करवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, गणेश कापरे, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला.
पहिल्या दिवसापासून पोलीसांना हा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता वाटत होती. त्यांनी तपास करण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषन, पारंपारीक तपास पध्दतीचा वापर केला. हा खुन मनिषा किरण लोखंडे व तिचा साथिदार गणेश मितू आगलावे यांनी केला असल्याचे निष्पन्न करुन त्यांचे विरुध्द जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन त्यांना अटक केली होती. परंतू या गुन्हयातील आरोपी विकास गणेश म्हस्के हा गुन्हा घडलेपासून फरारी होता.








