पर्वरी : म्हापसा येथील नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या खुल्या शेतजमिनीत एका 33 वर्षीय नेपाळी तऊणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडल्यानंतर म्हापसा पोलिसांनी तपासाअंती खुन्याचा शोध लावून अवघ्या 24 तासांत अटक केली. सोमवारी 17 रोजी त्याला जेरबंद केले. सदर संशयित करण महादेव शिंदे (19, गिरी-म्हापसा) असे नाव असून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. सोमवारी पर्वरी अधीक्षकांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक निधीन वाल्सन यांनी माहिती दिली. मृत व्यक्तीचे नाव नबीन बीके असून तो नेपाळचा नागरिक आहे. बार्देशमधील सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एकाकंपनीचा तो कर्मचारी होता. पोलिसांनी तपासकामात घटनास्थळी सायंटिफीक पथक, श्वान पथक आणि इतर शोध पथकांद्वारे घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हापसा शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. अखेर पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजवर शनिवारी 15 रोजी पहाटे 3 वाजता एका इसमाबरोबर संशयित आरोपी करण महादेव शिंदे दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने नबीनच्या बरोबर जास्त दारू पिण्याचे ठरवले आणि दोघेही जवळच्या शेतात गेले. तेथे त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि करणने रागाच्या भरात नबीनच्या मानेत दारूची बाटली खुपसली असे आरोपीने कबूल केले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. नबीन बीके याचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीवर भादंसं 302 कमलाखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्हा करतेवेळी वापरलेले रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. हे संपूर्ण प्रकरण उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन (आयपीएस), म्हापसा उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक सुनील पाटील, विराज कोरगावकर, बाबलो परब, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, पोलीस शिपाई प्रकाश पोळेकर, आनंद राठोड, अक्षय पाटील आणि राजेश कांदोळकर यांनी या शोध मोहिमेत भाग घेतला होता.
Previous Articleवाळपईत घरावर झाड कोसळून हानी
Next Article शारदा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा 23 रोजी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









