गावात पोलीस आल्याचे समजताच घेतला गळफास : दुसऱ्या आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न
बेळगाव : कोडगानूर (ता. अथणी) येथील दुहेरी खून प्रकरणाचा छडा लावण्यात अथणी पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. या प्रकरणातील एका आरोपीने आत्महत्या केली आहे. रविवार दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी चंद्रव्वा अप्पाराय इचेरी (वय 65), तिचा मुलगा विठ्ठल अप्पाराय इचेरी (वय 42) या माय-लेकाचा खून करून मृतदेह उसाच्या मळ्यात टाकून देण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. सुरेश रामप्पा सौंदत्ती (वय 36, रा. शेगुणसी) हा या प्रकरणाचा प्रमुख संशयित असून त्याला अटक करण्यासाठी पोलीस गावात आल्याचे समजताच उसाच्या मळ्यात जाऊन झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित श्रीशैल होरट्टी (वय 39) यानेही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्या करणारा सुरेश हा खून झालेल्या चंद्रव्वा व विठ्ठल यांचा नातेवाईक होता. जमीन वादातून श्रीशैलच्या मदतीने त्याने या माय-लेकांचा काटा काढला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुरेशने श्रीशैलशी संपर्क साधून आम्हाला अटक करण्यासाठी पोलीस गावात आले आहेत. मी आत्महत्या करतो आहे, आता तुझे तू बघ असे सांगत त्याने आपले जीवन संपविले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या श्रीशैलला पोलिसांनी बचावले आहे. त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.









